मुलीचा कायदेशीररित्या या रकमेवर अधिकार आहे, असे म्हणत खंडपीठाने याबाबत २८ नोव्हेंबर २०२४ रोजी विभक्त राहत असलेल्या दाम्पत्याने केलेल्या कराराचा उल्लेख केला. यावर मुलीनेही स्वाक्षरी केली होती. पतीने त्याच्या विभक्त पत्नीला आणि मुलीला एकूण ७३ लाख रुपये देण्यास सहमती दर्शवली होती. त्यापैकी ४३ लाख रुपये मुलीच्या शैक्षणिक गरजांसाठी आणि उर्वरित पत्नीसाठी होते. मुलीला तिच्या पालकांकडून शैक्षणिक खर्चासाठी आवश्यक निधी मिळवण्याचा नाकारता न येणारा, कायदेशीर आणि वैध हक्क आहे. त्यासाठी पालकांना त्यांच्या क्षमतेनुसार आवश्यक निधी देण्यासाठी भाग पाडले जाऊ शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
न्यायमूर्ती सूर्य कांत आणि उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने एका वैवाहिक वादाच्या पार्श्वभूमीवर ही टिप्पणी केली आहे. विभक्त झालेल्या एका दाम्पत्याच्या आयर्लंडमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलीने तिच्या आईला दिल्या जाणाऱ्या एकूण पोटगीतील वडिलांनी शिक्षणासाठी दिलेले ४३ लाख रुपये घेण्यास नकार दिला. मात्र, याबाबत न्यायालयाने टिप्पणी केली आहे. खंडपीठाने याबाबत २ जानेवारीला आदेश दिला आहे. ‘मुलगी म्हणून तिला तिच्या पालकांकडून शिक्षणाचा खर्च मिळवण्याचा अपरिहार्य, कायदेशीरदृष्ट्या लागू होणारा आणि वैध अधिकार आहे. मुलीला तिचे शिक्षण सुरू ठेवण्याचा मूलभूत अधिकार आहे आणि यासाठी पालकांना त्यांच्या आर्थिक साधनांच्या मर्यादेत आवश्यक निधी देण्यास भाग पाडले जाऊ शकते’, असे न्यायालयाने म्हटले आहे. मुलीने तिचा स्वाभिमान जपण्यासाठी ती रक्कम घेण्यास नकार दिला होता आणि वडिलांना पैसे परत घेण्यास सांगितले होते. परंतु, वडिलांनी त्यास नकार दिला होता.