शाळेच्या पहिल्या दिवशी आमदारसाहेब प्रवेशित चिमुकल्यांना करणार गुडमॉर्निंग
नवीन शैक्षणिक सत्रात उपक्रम : ‘१०० शाळांना भेटी’ कार्यक्रम, शासनाचे आदेश धडकले
सन २०२५-२६च्या शैक्षणिक सत्रात शाळेच्या पहिल्या दिवशी आमदार, अधिकारी व अन्य लोकप्रतिनिधी विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. शालेय शिक्षण विभागाने ‘१०० शाळांना भेटी’ कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबविला जाणार आहे.पहिल्या इयत्तेत येणाऱ्या लहान मुलांसाठी शाळेचा पहिला दिवस काहीसा आव्हानात्मक असतो. आईवडिलांचा हात सोडून शाळेच्या इमारतीत येताना अनेक मुलांना भावनात्मकदृष्ट्या अडचणी येतात. मात्र मुलांसाठी हा दिवस आनंददायी करण्यासाठी शिक्षण विभागाकडून हा उपक्रम राबविला जाणार आहे.
काय आहे १०० शाळांना भेटी कार्यक्रम भेटीदरम्यान शाळा इमारत, विद्यार्थ्यांसाठी खेळाच्या सुविधा, विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेच्या सवयी, शालेय पोषण आहार यांचाही आढावा घेतला जाणार आहे. या माध्यमातून संवाद वाढेल.
समस्या होणार अवगत
शाळेची धोकादायक इमारत, अस्वच्छ किंवा पाण्याअभावी बंद शौचालये अशा समस्या आढळल्यास अधिकारी वर्ग तातडीने त्या सोडविण्यासाठी सूचना देतील. त्यामुळे शाळांमधील अनेक समस्या तातडीने निकाली निघण्याची शक्यता आहे.
