गडचिरोली, दि. 8 : समाजातील जातिभेद व अस्पृश्यता निर्मूलनासाठी राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजने अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील 450 आंतरजातीय विवाहीत जोडप्यांना प्रत्येकी 50,000 याप्रमाणे एकूण २ कोटी २५ हजारांचे अर्थसहाय वितरित करण्यात आले आहे.
या योजनेचे उद्दिष्ट समाजात समता, बंधुता आणि सामाजिक सलोखा निर्माण करणे हे असून, आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना आर्थिक मदतीच्या स्वरूपात प्रोत्साहन देण्यात येते. योजनेअंतर्गत केंद्र व राज्य शासनाचा समान (50:50) हिस्सा असतो.
वित्तीय वर्ष 2024-25 मध्ये गडचिरोली जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाला शासनाकडून एकूण 2 कोटी 25 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. या निधीमधून 450 पात्र लाभार्थी जोडप्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट प्रणालीद्वारे 31 मार्च 2025 पर्यंत हे अर्थसहाय जमा करण्यात आले.
विशेष म्हणजे, सन 2021-22 पासून प्रलंबित असलेल्या सर्व पात्र लाभार्थींनाही योजनेचा लाभ यंदा वितरित करण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना जिल्हा परिषद गडचिरोलीचे समाजकल्याण अधिकारी चेतन हिवंज यांनी सांगितले की, शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे समाजातील जातीभेद दूर होण्यास हातभार लागेल तसेच आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचे मनोबल वाढेल. भविष्यात अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
