आजच्या डिजीटल युगात विद्यार्थी हे जास्त करुन मोबाईकडे वळत आहे त्यांची आपल्या मातीशी व संस्कृतीशी नाळ तुटू देऊ नका यासाठी शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षणाची व्याप्ती वाढवावी, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भूसे यांनी सातारा येथील सैनिकी शाळेत शालेय शिक्षण विभागाची कोल्हापूर आढावा बैठक घेतली. बैठकीला शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, महाराष्ट्र राज्य शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहूल रेखावार, कोल्हापूरचे शिक्षण उपसंचालक महेश चौथे, राजेश क्षीरसागर यांच्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधूदूर्ग जिल्ह्यातील शिक्षक उपस्थित होते.
जे शिक्षक समर्पित, प्रतिकूल परिस्थिती विद्यार्थ्यांच्या विचार करुन उपक्रम राबवून गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहेत, अशा शिक्षकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे, असे सांगून शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे म्हणाले, शालेय विद्यार्थ्यांसाठी शासन विविध योजना उपक्रम राबवित आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते यामध्ये कोणी गंभीर आजाराचा विद्यार्थी आढळल्यास तालुका, जिल्हास्तरावर आरोग्य सुविधा द्याव्यात या सुविधा उपलब्ध नसतील तर मुंबई उपचारासाठी घेऊन यावे विद्यार्थ्याला बरा करुन घरी सोडावे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी सी.बी.सी. मधील अभ्यासक्रमाचाही राज्य शासनाने समावेश केला आहे. जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये पट वाढविण्यासाठी गुढी पाडवा पट वाढवा, शाळेमध्ये देण्यात येणाऱ्या सुविधांचे फलक असे विविध उपक्रम राबवित आहेत हे उपक्रम पुढील काळातही राबवित रहा, असे मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांची सहल शेतकऱ्यांच्या बांधावर, शासकीय कार्यालय, गॅरेज, किराणा दुकान अशा ठिकाणी घेऊन तेथे चालणाऱ्या कामकाजा विषयी सांगावे. शिक्षकांचे व संस्थाचालकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी बैठका घेतल्या आहेत हे प्रश्न टप्या टप्याने सोडविले जातील, असेही मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.
सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधूदूर्ग जिल्ह्यातील आदर्श शाळेतील शिक्षकांनी त्यांच्या शाळेत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली.
