एटापल्ली वनपरिक्षेत्रात गावविकासाची विविध कामे पूर्ण; वनसंवर्धनासोबत रोजगारनिर्मितीलाही चालना!
अवैध सागवान वाहतुकीवर वनविभागाची मोठी कारवाई; ५५ ट्रॅक्टर जप्त, २० कोटींचा महसूल, स्थानिकांना रोजगाराच्या संधी
एटापल्ली, दि. २५ नोव्हेंबर : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणि वनबहुल एटापल्ली परिसरात वनसंरक्षण, वनसंपत्तीचे संवर्धन, अवैध वृक्षतोड आणि वनसंपत्तीच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासोबतच गावविकास आणि रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी वनविभागाच्या माध्यमातून मागील तीन वर्षांत विविध महत्त्वपूर्ण कामे करण्यात आली आहेत. भामरागड वनविभागांतर्गत येणाऱ्या एटापल्ली वनपरिक्षेत्रात वनसंपत्तीचे संरक्षण आणि स्थानिक नागरिकांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत.
अवैध सागवान वाहतुकीवर मोठी कारवाई
एटापल्ली वनपरिक्षेत्रात मागील तीन वर्षांत सागवानाची अवैध वाहतूक करणारे ५५ ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत सुमारे १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच पाखांजूर परिसरात विशेष कारवाई करून सुमारे ६० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जावेली, धनपाडी, नेनवाडी, हालेवारा आणि मोहुली परिसरात अवैध सागवान वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. दोन बोलेरो वाहनांसह एक आयशर ट्रक आणि अन्य वाहनांच्या माध्यमातून होणाऱ्या अवैध वाहतुकीवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वनविकास कामांतून स्थानिकांना रोजगार
वनविकासाच्या विविध कामांतून स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यावरही वनविभागाने भर दिला आहे. यासाठी कूपकाम, बांबू तोड आणि इतर कामे हाती घेण्यात आली आहेत.
२०२३-२४ मध्ये १२ कूपांमध्ये ११ हजार घनमीटर इमारती लाकूड आणि १८ हजार बिट उत्पादन करण्यात आले. २०२५ मध्ये १५ कूपांमधून ९ हजार घनमीटर इमारती लाकूड आणि ६ हजार ७०० बिट उत्पादन झाले. २०२६ मध्येही पाच कूपांमध्ये कामे सुरू आहेत.
उत्पादित वनमालाची ई-लिलाव पद्धतीने विक्री करण्यात आली असून, त्यातून सुमारे २० कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. एटापल्ली येथे ५० हजार रोपांची आधुनिक मिस्ट रोपवाटिका उभारण्याचा उपक्रमही हाती घेण्यात आला आहे.
दुर्गम गावांमध्ये पायाभूत सुविधांवर भर
दुर्गम गावांमधील नागरिकांना भेडसावणाऱ्या विजेच्या समस्येची दखल घेत २० गावांमध्ये सार्वजनिक सोलर हिटर बसविण्यात आले आहेत. तसेच वनसंरक्षण आणि वनकर्मचाऱ्यांच्या कामकाजासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे.
वनजमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी बांधकामे आणि एटापल्ली परिसरातील विविध ठिकाणी आवश्यक कारवाया करण्यात आल्या आहेत. वनचौक्या आणि वनकर्मचाऱ्यांसाठी कॅम्प सुविधांच्या उभारणीची कामेही हाती घेण्यात आली आहेत.
वनसंरक्षणासोबत गावविकासाचे उद्दिष्ट
वनसंपत्तीचे संरक्षण करताना स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देणे, वनउत्पादनाला बाजारपेठ मिळवून देणे आणि दुर्गम गावांमध्ये मूलभूत सुविधा निर्माण करणे, या उद्देशाने वनविभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
वनसंवर्धन आणि गावविकास यांचा समतोल राखत एटापल्ली वनपरिक्षेत्रात राबविण्यात आलेल्या या कामांमुळे वनसंपत्तीचे संरक्षण, स्थानिक रोजगारनिर्मिती आणि ग्रामीण विकासाला चालना मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.





