मुंबई, दि. 9 : प्रसिद्ध स्त्रीरोग तसेच आयुर्वेद तज्ज्ञ डॉ हणमंतराव पालेप यांनी लिहिलेले ‘दोष धातू मल विज्ञान‘ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. कार्यक्रमाला नागालॅन्डचे माजी राज्यपाल पद्मनाभ आचार्य व पॉप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ उपस्थित होते.
भारतीय आरोग्य चिकित्सा पद्धती तसेच तत्वज्ञानात प्रत्येक गोष्टीचा समग्र आणि साकल्याने विचार केला आहे. देशातील ऋषीमुनींनी गहन संशोधनानंतर काढलेले सार आयुर्वेदाच्या माध्यमातून उपलब्ध आहे. आयुर्वेद सर्व दृष्टीने सुरक्षित चिकित्सा पद्धती आहे. आज ॲलोपॅथीला पर्याय नाही. मात्र रुग्णाला सेवा देताना ॲलोपॅथीसोबत आयुर्वेदाचा देखील विचार झाला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी यावेळी केले.
आयुर्वेद जीवन पद्धतीमध्ये आहाराला देखील विशेष महत्व आहे, असे सांगून ‘रीत भूक, मित भूक आणि हित भूक‘ हा समन्वय पाळल्यास अनेक आजारांपासून रक्षण करता येते असे राज्यपालांनी सांगितले.
आयुर्वेद हे एक परिपूर्ण विज्ञान आहे. परंतु आयुर्वेद समजण्याकरिता संस्कृत भाषा व भारतीय तत्वज्ञान समजणे गरजेचे आहे. आयुर्वेदाबद्दल अनेक गैरसमज आहेत. ‘दोष धातू मल विज्ञान‘ या पुस्तकाच्या माध्यमातून आयुर्वेद व आधुनिक चिकित्सा पद्धतीमधील दरी कमी करण्याचा आपण प्रयत्न केला असल्याचे लेखक डॉ पालेप यांनी सांगितले.