ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

शेतकऱ्यांसाठी खुशखबर, पिकांचे नुकसान टाळण्यासाठी मोठा निर्णय..

कधी अतिवृष्टी, तर कधी कोरडा दुष्काळ.. कधी रोगराई, तर कधी कोसळलेले भाव.. अशा अस्मानी व सुलतानी संकटात शेतकरी सापडला आहे.. या बळीराजाचे उत्पन्न दुप्पट व्हावे, त्याच्या घरात आनंदाचे दोन क्षण यावेत, यासाठी केंद्र व राज्य सरकार सातत्याने विविध योजना, उपक्रम राबवत असते..

शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाची माहिती मिळावी, त्यातून होणारे नुकसान टाळता यावे, यासाठी राज्य सरकारने तीन वर्षांपूर्वी एक मोबाईल ॲप आणले होते. ‘मेघदूत’ असं या मोबाईल ॲपचं नाव.. भारतीय हवामान विभाग, भारतीय कृषि अनुसंधान परिषद व पुणे येथील भारतीय उष्ण प्रदेशिय हवामान विज्ञान संस्था यांच्यामार्फत हे ॲप विकसीत करण्यात आले होते.

शेतकऱ्यांना पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज या ॲपवर मिळत होता. तसेच शेतकरी मागील 10 दिवसांतील हवामानाचा आढावाही या ॲपमुळे घेऊ शकत होते. मात्र, आता हवामान विभागाने या ॲपमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत. हे ॲप अधिक अद्ययावत केले आहे. याबाबत जाणून घेऊ या..

‘मेघदूत’ ॲपमधील बदल

शेतकऱ्यांना आता दर तीन तासांनी हवामानाबाबतच्या गंभीर इशाऱ्यांची माहिती ॲपवर मिळणार आहे. तसेच, शेतीवर आधारित अन्य गोष्टींचीही माहिती मिळणार आहे.
▪️ ॲपद्वारे मिळणारी माहिती, सल्ले देशातील 732 जिल्ह्यांतील 1019 स्थानकांवरून एकत्रित केले जाणार आहेत.

▪️ मेघदूत ॲपवर आता दर मंगळवारी व शुक्रवारी द्वि-साप्ताहिक हवामान सूचना अपडेट केल्या जाणार आहेत. भौगोलिक क्षेत्रावरील अल्प-मुदतीच्या व विस्तारित-श्रेणीच्या (एक पंधरवड्याच्या) हवामान अंदाजांवर हे अपडेट आधारित असेल.

जिल्हा व तालुका स्तरावर आगामी पाच दिवसांसाठी संभाव्य तापमान, आर्द्रता, पाऊस, वाऱ्याचा वेग व त्याची दिशा, याबाबत शेतकऱ्यांना अपडेट मिळणार असल्याने, शेतकऱ्यांना सजग राहता येईल.

▪️ सगळ्यात महत्वाचं म्हणजे, दर तीन तासांनी हे ॲप अपडेट केले जाणार आहे.. त्यामुळे हवामान बदलाबाबतची माहिती, तसेच सल्ल्याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार असल्याचा दावा केला जात आहे.