राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री गिरीष महाजन यांनी खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्रोत्साहन मिळण्याच्या हेतूने बक्षिसाच्या रकमेची वाढ केल्याचं समजतंय. यामुळे सहभागी खेळाडूंची संख्या वाढेल आणि अधिकाधिक खेळाडू, युवक खेळाकडे आकर्षित व्हावे याकरीता राज्य शासनाने राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मधील पदक विजेत्या क्रीडापटूंच्या बक्षिस रकमेत ही मोठी वाढ केली आहे.
पत्रकार परिषदेत माहिती देताना मंत्री महाजन म्हणाले..
देशातील पंजाब, हरियाणा राज्यात खेळाडूंना प्रोत्साहनासाठी देण्यात येणाऱ्या बक्षिस रकमेच्या तुलनेत राज्याची रक्कम कमी असल्याने ती आता जवळपास 5 पट वाढविण्यात आली आहे.
पूर्वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना 10 लाख रुपये देण्यात येत होते. आता ती बक्षिसाची रक्कम 50 लाख रुपये केली आहे.
रौप्यपदक विजेत्या खेळाडूंसाठी 7.50 लाख रुपये ऐवजी 30 लाख रुपये बक्षिसाची रक्कम इथून पुढे देण्यात येईल.
कांस्यपदक विजेत्या खेळाडूंना 5 लाख रुपये ऐवजी 20 लाख रुपये रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे
मार्गदर्शकांसाठी: खेळाडूंच्या मार्गदर्शकांच्याही बक्षिसांच्या रकमेत वाढ केली आहे. सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंच्या मार्गदर्शकासाठी 12.50 लाख रुपये, रौप्यपदक विजेत्या खेळाडूंच्या मार्गदर्शकांसाठी 7.50 लाख रुपये तर कांस्यपदक विजेत्या खेळाडूंच्या मार्गदर्शकांसाठी 5 लाख रुपये बक्षिस देण्याचे जाहीर केले आहे.
ग्रामीण, आदिवासी खेळाडूंना अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याकरीता विविध उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला जाईल. राज्यातील 124 तालुका क्रीडा संकुलाचे काम प्रगतीपथावर आहे. तालुका, जिल्हा, विभाग यासाठी वेगळ्या निधीची तरतूद केली असून खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी 80 प्रशिक्षक नेमण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. राज्यातील विभाग, जिल्हा, तालुका, क्रीडा संकुलांसाठी देण्यात येणारा निधी आणि सोयी-सुविधा वाढविण्याचा प्रयत्न केला जाईल, असं देखील श्री. महाजन यांनी सांगितलं.