राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने त्यांच्या एबीडीएम अर्थात आयुष्मान भारत डिजिटल अभियान या महत्त्वपूर्ण योजनेअंतर्गत आता नवी दिल्ली येथील लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालय (एलएचएमसी) आणि श्रीमती सुचेता कृपलानी रुग्णालयात (एसएसकेएच) असलेल्या नव्या बाह्य रुग्ण विभागासाठी जलद बाह्य रुग्ण नोंदणी सेवेची प्रायोगिक तत्वावर सुरुवात केली आहे.
या सेवेअंतर्गत जुन्या तसेच नव्या रुग्णांना केवळ क्यू आर कोड स्कॅन करून त्यांचे नाव, पित्याचे नव, वय, लिंग, निवासाचा पत्ता, मोबाईल क्रमांक इत्यादी तपशील रुग्णालय व्यवस्थापनाशी सामायिक करावे लागतील.
या नव्या सुविधेमुळे रुग्णांना बाह्य रुग्ण विभागात नोंदणी खिडकीपाशी कमी वेळ जाईल, रुग्णालयातील नोंदींसाठी अचूक माहिती उपलब्ध होईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लांबच लांब रांगांमध्ये ताटकळत वाट पाहण्यापासून सुटका होईल. आता ही सुविधा इतर आरोग्य सुविधा केंद्रांमध्ये आणि विभागांमध्ये सुरु करण्यात येणार आहे.
क्यू आर कोडवर आधारित बाह्य रुग्ण नोंदणी सेवेमध्ये रुग्णांना त्यांच्या मोबाईल फोनवरून ( फोनमधील कॅमेरा/स्कॅनर/एबीएचए अॅप / आरोग्य सेतू अॅप/ किंवा एबीडीएम सक्षम इतर कोणतेही अॅप यांचा वापर करून) रुग्णालयाचा विशिष्ट क्यू आर कोड स्कॅन करावा लागेल तसेच इतर व्यक्तिगत तपशील रुग्णालय यंत्रणेशी सामायिक करावे लागतील.
एकदा हे तपशील सामायिक केले की रुग्णालयाच्या यंत्रणेकडून रुग्णाला टोकन क्रमांक (रांगेतील क्रमांक) दिला जाईल. हे देण्यात आलेले टोकन रुग्णाने निवडलेल्या अॅपमध्ये सूचनेच्या स्वरुपात पाठविले जाईल तसेच रुग्णांच्या सोयीसाठी बाह्य रुग्ण विभागात लावलेल्या पडद्यांवर देखील दाखविले जाईल. रुग्णांचे तपशील अगोदरच नोंदणी खिडकीवरील कर्मचाऱ्याकडे उपलब्ध असल्यामुळे, रुग्ण त्यांच्या टोकन क्रमांकानुसार नोंदणी खिडकीवर जाऊन थेटपणे डॉक्टरांच्या भेटीसाठीच्या त्यांच्या बाह्य-रुग्ण पावत्या घेतील.
या सेवेच्या फायद्याविषयी बोलताना, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.आर.एस.शर्मा म्हणाले, “आयुष्मान भारत डिजिटल अभियानाअंतर्गत, आम्ही प्रक्रियांचे सुलभीकरण करण्यासाठी तसेच आरोग्यसेवा अधिक कार्यक्षम करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. क्यू आर कोडवर आधारित जलद बाह्य रुग्ण नोंदणी सेवा हे या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. एलसीएमएच आणि एसएसकेएच मध्ये प्रायोगिक तत्वावर सुरु केलेल्या या सेवेमुळे 15 दिवसांत सुमारे 2200 रुग्णांना लांबलचक रांगांमधली त्रासदायक प्रतीक्षा टाळणे आणि वेळेची बचत करणे शक्य झाले आणि नोंदणी खिडकीवर देखील अत्यंत कमी वेळात काम झाले. शहरातील इतर आरोग्य सेवा केंद्रांमध्ये तसेच विभागांमध्ये अशाच प्रकारची सुविधा सुरु करण्यासाठी आमचे पथक त्यांच्या व्यवस्थापनासोबत काम करीत आहे.”
एबीडीएमच्या पथकाने एलसीएमएच आणि एसएसकेएचच्या बाह्य रुग्ण विभागात क्यू आर कोडवर आधारित जलद नोंदणी सेवा सुरु करण्यासाठी त्यांच्या पथकांसोबत समन्वयाने काम केले. रुग्णांचा प्रतीक्षा कालावधी कमी करण्यासाठी योग्य प्रकारचे संदेश वाहक आणि किऑस्क बसविण्यात आले आहेत. तसेच रुग्णांना ही सुविधा समजून घेऊन वापरण्यात आणि लाभ घेण्यात मदत करण्यासाठी कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
या पथकाने रुग्णांना त्यांच्या आरोग्यविषयक नोंदींचे डिजिटलीकरण करण्यासाठी मदत व्हावी म्हणून त्यांची आयुष्मान भारत खाती उघडण्यात किंवा एबीएचए क्रमांक मिळविण्यात देखील मदत केली आहे. रुग्णांचा वेळ आणि श्रम वाचावेत या हेतूने अशाच प्रकारची सुविधा आता इतर रुग्णालये, दवाखाने, निदान प्रयोगशाळा इत्यादी आरोग्य सुविधांच्या ठिकाणी देखील सुरू करण्यात येणार आहे.