ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

शेतीबाबत उपमुख्यमंत्र्यांकडून मोठ्या घोषणा, शेतकऱ्यांचा होणार फायदा..

रासायनिक खतांमुळे शेतीचा पोत खराब झाला आहे. ‘ग्लोबल वॉर्मिंग’चा धोका लक्षात घेता, राज्यातील 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

ते म्हणाले, की डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात 2025 पर्यंत नैसर्गिक शेती वाढवणार आहोत. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात 2016-17 मध्ये सुरू केलेले डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन यशस्वी ठरले आहे. या मिशनला नव्याने मुदतवाढ देण्यात येईल.

पुन्हा जलयुक्त शिवार

जलयुक्त शिवार योजनेचा शेतकऱ्यांना खूप फायदे झाले. त्यामुळे आता नव्या स्वरुपात ही योजना आणली जाईल. आता गावे जलस्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पावसाच्या पाण्याचा योग्य उपयोग गावात व्हावा, हे ध्येय ठेवून योजना राबवणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

स्मार्ट प्रकल्पाला गती

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने महाराष्ट्रातील 10 हजार गावांत ‘स्मार्ट’ प्रकल्प सुरु केला. या प्रकल्पावर 2100 कोटी रुपये खर्चून त्या माध्यमातून बाजारपेठेची श्रृंखला तयार केली जाईल. शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी ही प्रकल्प राबवत असून, त्यालाही गती देण्यात येणार असल्याचे फडणवीस म्हणाले.