मुंबई, दि. 9 : राज्यात लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले, अशा 4 हजार 62 पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई म्हणून 10.44 कोटी रुपये जमा करण्यात आले असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.
श्री. सिंह म्हणाले, राज्यामध्ये दि. 9 नोव्हेंबर 2022 अखेर 33 जिल्ह्यांमधील एकूण 3439 संसर्ग केंद्रांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 221826 बाधित पशुधनापैकी एकूण 152114 पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरित बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. बाधित पशुधनापैकी 14612 पशुधनाचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण 144.12 लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण 137.07 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे व जळगांव, अहमदनगर, धुळे, अकोला, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, वाशिम, जालना, हिंगोली, नंदुरबार आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांची आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सुमारे 97.96 टक्के गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले आहे.
महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठाने दि. 7 ऑक्टोबर, 2022 रोजी कीटकांच्या नियंत्रणासाठी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून राज्यात गोठ्यातील कीटक नियंत्रण, निर्जंतुकीकरण या महत्त्वपूर्ण बाबी पशुपालक व ग्रामपंचायती यांनी मोहीम स्वरूपात राबविण्यात याव्यात. शासकीय आणि खाजगी पशुवैद्यकांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने दि. 17.10.2022 रोजी दिलेल्या सुधारीत उपचार पद्धतीप्रमाणे उपचार करावेत. शासकीय अधिकाऱ्यांनी पशुपालकांकडे जाऊन औषधोपचार व लसीकरण करावे. शासनाकडून मोफत औषधोपचार व लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असल्यामुळे सर्व पशुपालकांनी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या पशुधनावर उपचार करून घेण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. सिंह यांनी केले आहे.
नुकत्याच क्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय कृती दलासमवेत झालेल्या दृकश्राव्य माध्यमाद्वारे आढावा बैठकीमध्ये लसीकरण न केलेल्या आणि लम्पी चर्मरोगाने बाधित नसलेल्या गायींच्या कुठल्याही वयाच्या वासरांना, तसेच अद्यापही लसीकरण न झालेल्या गोवंशीय पशुधनास लसीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले. यानुसार, गौपालकांनी वासरे व गोवंशीय पशुधनास क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकक्षेतील गावांमध्ये अशा लसीकरणासाठी मोहीम स्वरूपात पूर्वनिर्धारित केलेल्या दिवशी लसीकरण करून घेण्याचे आवाहनही पशुसंवर्धन आयुक्त श्री.सिंह यांनी केले आहे.