मुंबई, दि. 10 : चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या मानव- वन्यजीव संघर्ष मोठ्या प्रमाणात असलेल्या जिल्ह्यांमध्ये दिवसा होणारे कृषीपंपांचे वीज भारनियमन रद्द करून सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या वेळात कृषीपंपांना सलग वीजपुरवठा करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुधीर मुनगंटीवार यांनी चर्चा केली आहे, उपमुख्यमंत्र्यांनी यासंबंधी तात्काळ सकारात्मक कार्यवाहीचे निर्देश ऊर्जा विभागाला दिले आहेत.
या जिल्ह्यांमध्ये दुपारच्या वेळी कृषी पंपांसाठी वीज भारनियमन करण्यात येत असल्यामुळे रात्रीच्या वेळी शेतकरी संबंधित कामांसाठी शेतात जातात. अशा वेळी वन्यप्राण्यांच्या होणा-या हल्ल्यात शेतक-यांचे बळी जाण्याचा घटनांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबतचे आदेश लवकरच निर्गमित होणार असून या माध्यमातून चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्हयातील शेतकरी, शेतमजूर बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे.