मुंबई, दि. १० – ‘राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. याअंतर्गत कोकणचा कॅलिफोर्निया करायचा आहे, मात्र कोकणचे कोकणत्व जपून’ असे प्रतिपादन शालेय शिक्षण तथा मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केले.
महासंस्कृती व्हेंचर्सच्या वतीने ‘कोकण सन्मान २०२२’ कार्यक्रमात मंत्री श्री.केसरकर यांच्या हस्ते कोकणातील संस्कृतीचा वारसा जतन करण्यासाठी योगदान देणाऱ्या विविध व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महासंस्कृती व्हेंचर्सच्या संस्थापक संचालक शिल्पा परांडेकर, संचालक ऋतुराज हेसी आदी यावेळी उपस्थित होते. श्री.केसरकर यांच्या हस्ते यावेळी कोकणातील संस्कृती दर्शविणाऱ्या ‘द अनएक्सप्लोरड् लेगसी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
मंत्री श्री.केसरकर म्हणाले, कोकणचे स्वत:चे वेगळे वैशिष्ट्य आहे. जंगल, किल्ले, समुद्र किनारे असा विविधांगी सर्वोत्तम निसर्ग कोकणात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकण किनाऱ्याचे महत्त्व लक्षात घेऊन समुद्री किल्ले उभारले. जेवढे बॅक वॉटर केरळमध्ये आहे तेवढे कोकणातही आहे. कोकणवासियांनी सकारात्मक दृष्टीकोन बाळगून नवीन गोष्टी स्वीकारायची तयारी ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. ज्या भूमीने जन्म दिला ते मातृऋण कधीतरी फेडावे लागते. महासंस्कृती व्हेंचर ते काम करीत असल्याबद्दल कौतुक करून कोकणचा वारसा जतन करण्यासाठी योगदान देणाऱ्या पुरस्कार विजेत्यांचे त्यांनी अभिनंदन केले.
कोकणातील संस्कृतीचा वारसा दाखविणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले.