महाराष्ट्रातील भाजीपाला उत्पादनास प्रोत्साहन देऊन शेतकऱ्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत महाराष्ट्रात “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका (नर्सरी) योजना” राबविण्यात येत आहे. बागायती क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणावर भाजीपाला क्षेत्र आहे. भाजीपाला उत्पादनाला प्रोत्साहन देऊन शेतक-यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकार रोपवाटीका योजना राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत राबविण्याचे प्रस्तावित आहे प्रकल्पासाठीची प्रस्तावित खर्च मर्यादा व अनुदानाची मर्यादा ही प्रचलित केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत खर्च व अनुदान मर्यादेनुसार असल्याने सदर प्रकल्प राष्ट्रीय कृषि विकास योजनेमधून राबविण्यास मान्यता देण्यासाठी प्रस्ताव राष्ट्रीय कृषि विकास योजनेची अंमलबजावणी व सनियंत्रणासाठी स्थापित केलेल्या राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीसमोर मान्यतेसाठी सादर करण्यात आला असता. सदर प्रस्तावास समितीचे अध्यक्ष तथा मुख्य सचिव यांनी मान्यता दिल्याने याबाबत उचित शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना (नर्सरी योजना) – Punyashlok Ahilyadevi Holkar Nursery Yojana:
भाजीपाला उत्पादनाला प्रोत्साहन देऊन शेतक-यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना सन २०२१-२२ व २०२२-२३ या वर्षात राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत राबविण्यास खालील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजनेचे स्वरूप खालीलप्रमाणे राहील.
योजनेचे महत्व :
महाराष्ट्र राज्य हे फलोत्पादनामध्ये अग्रेसर असून राज्यात मोठ्या प्रमाणात फळे व भाजीपाला पिकांचे व्यवसायिक पध्दतीने लागवड करून उत्पादन घेतले जाते. तसेच त्यांची निर्यातही मोठ्या प्रमाणात करण्यात येते. मागील २ ते ३ वर्षापासून पिकाचे निर्यातक्षम व विषमुक्त उत्पादन करण्याकडे शेतकऱ्यांचे कल वाढत आहे. यादृष्टीने भाजीपाला रोपांची नियंत्रीत वातावरणामध्ये तयार झालेली किड व रोगमुक्त भाजीपाला रोपांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक तालुक्यात दर्जेदार कलने/रोप तयार करणाऱ्या लहान रोपवाटीका उभारण्यास वाव आहे.
योजनेचे उद्देश :
१) भाजीपाला पिकांची दर्जेदार व किडरोग मुक्त रोपे निर्मिती करून उत्पन्न व उत्पादनात वाढ करणे.
२) रोपवाटीकेमुळे स्थानिक शेतक-यांची शेतीपुरक व्यवसायाची संधी उपलब्ध करुन देणे.
३) पिक रचनेत बदल घडवून आणणे व नविन तंत्रज्ञानाचा वापर करणे.
४) शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न व भाजीपाला उत्पादनात वाढ करणे.
योजनेची व्याप्ती व उदिष्टे :
राज्यातील सर्व जिल्हयात भाजीपाला व रोपवाटीका स्थापन करण्यासाठी ही योजना राबविण्यात यावी. सदर योजने अंतर्गत १००० लाभार्थी निवडीचे उद्दिष्टे ठरविण्यात येत आहे.
योजनेतील घटक :
भाजीपाला रोपवाटीका स्थापन करण्यासाठी खालील मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. त्यामध्ये शेडनेट, पॉलीटनेल, नॅपसॅक पावर स्प्रेअर व प्लास्टीक क्रेटस् हे घटक आहेत. यापैकी स्थानिक परिस्थितीनुसार पॉलीटनेलची उभारणी करणे ऐच्छिक राहील.
लाभार्थी निवडीचे निकष:
अ) अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची किमान ०.४० हे. (१ एकर जमिन असणे आवश्यक आहे.
ब) रोपवाटीका उभारण्यासाठी पाण्याची कायमची सोय असणे आवश्यक आहे.
लाभार्थी निवडीचा प्राधान्यक्रमः
१. महिला कृषि पदवी/ पदवीका धारक
२. शेतकरी महिला गट
३. भाजीपाला उत्पादक अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी व शेतकरी गट
४. सर्वसाधारण शेतकरी याप्रमाणे प्राधान्यक्रम राहील.
भाजीपाला रोपवाटीका योजनेचा वित्तीय आराखडा:
भाजीपाला रोपवाटीका योजनेचा वित्तीय आराखडा खालील प्रमाणे आहे.
रोपवाटीकांचा संभावीत वापर:
१) भाजीपाला पिके: टोमॅटो, वांगी, कोबी, फुलकोबी, मिरची, कांदा, शिमला मिरची इत्यादी व इतर पिके.
२) फळपिके: पपई, शेवगा इत्यादी.
योजने अंतर्गत तांत्रिक प्रशिक्षण:
“भाजीपाला रोपवाटिकांचा लाभ घेऊ इच्छिणा-या लाभार्थ्यांना तीन ते पाच दिवसांचे तांत्रिक प्रशिक्षण हॉर्टीकल्चर ट्रेनिंग सेंटर, तळेगाव दाभाडे, कृषि विज्ञान केंद्र, बारामती व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ (MCDC) पुणे येथे घेणे अनिवार्य राहील.
अर्थसहाय्याचे स्वरूप :
१) सदर प्रकल्प राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या धर्तीवर राबविण्यात येईल. सदर योजनेअंतर्गत प्रकल्प उभारणी झाल्यानंतर मोका तपासणी करून ५० टक्के प्रमाणे अनुदान वितरीत करण्यात येणार. (रु.२.३० लाख कमाल मर्यादा)
२) या योजनेसाठी खर्च करताना सर्व वित्तीय नियम, विनियम शासन निर्णय, अधिसूचना, आदेश, केंद्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक सूचना आणि भारताचे नियंत्रक व महालेखापरिक्षक यांचे या संदर्भातील निरिक्षण यांचे पालन होईल या अटीच्या अधिन राहून निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
आवश्यक निधी : ३४ जिल्हात १००० रोपवाटीकांकरीता योजनेचा एकुण खर्च रु. ४६००.०० लाख इतका असून राकृवियो योजनेतून सन २०२१-२२ व २०२२-२३ साठी रु. २३२३.०० लाख निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
योजनेचा कालावधी : सदर योजनेचा कालावधी २ वर्षांचा राहील (सन २०२१-२२ व २०२२-२३).
योजनेची अंमलबजावणी : जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या मार्फत सदरची योजना राबविण्यात येईल.
अर्जाची पध्दत व निवड:
प्रकल्पांतर्गत महाडिबीटी प्रणालीवर लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्यांची निवड लॉटरी (Lottery) पध्दतीने करण्यात येईल.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया:
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. खालील संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर आधार क्रमांक टाकून फॉर्मर पोर्टल वर लॉगिन करा.
https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login
शेतकरी मोबाईल, संगणक/लॅपटॅाप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील आपले सरकार केंद्र इ. माध्यमातून महाडीबीटी या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.
महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन झाल्यावर सर्व वैयक्तिक तपशील भरा आणि पुढे आपल्याला “अर्ज करा” वर क्लिक करायचे आहे.
फॉर्मर लॉगिनच्या अर्जामध्ये विविध योजनेचे पर्याय आहेत, पण आपणाला फळबाग लागवड अनुदान योजनेसाठी “फलोत्पादन” हा पर्याय निवडून “बाबी निवडा” वर क्लिक करा.
आता अर्जदारास तपशील प्रविष्ट करणे आवश्यक आहे आणि त्यानंतर जतन करा बटणावर क्लिक करणे आवश्यक आहे.
अप्लिकेशन सबमिट केल्यावर ते सबमिशनच्या पुष्टीकरणासाठी पॉप अप संदेश दर्शवितो. “ओके” बटणावर क्लिक केल्यावर ते पेमेंट वर पुनर्निर्देशित होईल जिथे अर्जदार पैसे भरण्यास सक्षम असेल. मेक पेमेंट बटणावर क्लिक केल्यास ते पेमेंट गेटवे पोर्टलकडे पुनर्निर्देशित होईल. पेमेंट केल्यानंतर अर्जदार पेमेंट पावतीची प्रिंट आउट घेऊ शकतो.
कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग शासन निर्णय: राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना प्रकल्प सन २०२१-२२ व २०२२-२३ मध्ये राबविण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत दि. 27-10-2021 रोजीचा शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.