मुंबई, दि. 30 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शीख समाजाचे संस्थापक व पहिले गुरु गुरुनानक यांच्या जीवनकार्यावरील ‘गुरुनानक देव के संवाद और समाज को मार्गदर्शन’ या पुस्तकाचे राजभवन मुंबई येथे आज प्रकाशन करण्यात आले. लेखक व क्रीडा सुविधा विकासक राजन खन्ना तसेच स्तंभलेखक व संशोधक डॉ. रतन शारदा हे या पुस्तकाचे लेखक आहेत.
गुरुनानक यांच्या जीवनातून त्याग, करुणा, परोपकार व प्रेम या गुणांचे दर्शन होते. गुरूनानक यांनी नामजपाचे महत्त्व विशद केले तसेच, सर्व जीवांमध्ये परमेश्वर पाहण्यास सांगितले. गुरुनानक यांच्या शिकवणीतून प्रेरणा घेऊन गुरुगोविंद सिंह यांच्यासारखे शूरवीर संत निर्माण झाले, असे राज्यपालांनी सांगितले.
तणाव मुक्तीसाठी गुरुनानक यांचे विचार आजच्या पिढीसाठी प्रासंगिक आहेत, असे लेखक राजन खन्ना यांनी यावेळी सांगितले. तर, गुरुनानक यांनी विविध देशांमध्ये अंदाजे 30 हजार किलोमीटर भ्रमण करून प्रपंच सांभाळून सहज मुक्तीचा मार्ग दाखवला,असे लेखक डॉ. रतन शारदा यांनी सांगितले.
प्रकाशन सोहळ्याला ज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल, माजी प्रशासकीय अधिकारी विजय सतबीर सिंह, सेवानिवृत्त अधिकारी ले.जन. के. टी. परनाईक, अवतार सिंह सचदेव, आदी उपस्थित होते. बाल मलकित सिंह यांनी आभार मानले.