मुंबई, दि. ५ : “वस्त्रोद्योगामध्ये भारताने पूर्वीपासूनच आपले स्थान निर्माण केले आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. पारंपरिक कापड निर्मितीपासून ते तांत्रिक वस्त्रोद्योगाकडे वाटचाल सुरु असून या क्षेत्रात रोजगार निर्मितीला मोठी संधी उपलब्ध आहे. राज्याच्या प्रस्तावित नवीन वस्त्रोद्योग धोरणात १० लाख रोजगार निर्मिती आणि ३६ हजार कोटी रुपयांची गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे”, अशी माहिती वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
टेक्नोटेक्स-२०२३ कर्टन रेझर सेरेमनीचे हॉटेल ट्रायडंट मुंबई येथे आयोजन करण्यात आले होते. याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय वस्त्रोद्योग आयुक्त रुप राशी, केंद्रीय सहसचिव राजीव सक्सेना, फिक्कीचे चेअरमन मोहन कावरीय, एसआरटीईपीसीचे चेअरमन धीरज शहा, वस्त्रोद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले की, देशातील वस्त्रोद्योगात महाराष्ट्राचा महत्त्वाचा वाटा आहे. वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने वीज सवलत दिली आहे. वस्त्रोद्योगासाठी लागणारा कापूस सुरुवातीला कमी दरात उपलब्ध होतो. परंतु नंतरच्या काळात कापसाचे भाव खूप वाढलेले असतात. वस्त्रोद्योगासाठी नियमित योग्य दरात कापूस उपलब्ध व्हावा, यासाठी राज्य शासन मोठ्या प्रमाणात कापसाची थेट खरेदी करुन खरेदी केलेल्या भावामध्ये वस्त्रोद्योगासाठी कापूस पुरवठा करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. वस्त्रोद्योगातील संधी आणि त्यासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी कौशल्य आधारित अभ्यासक्रम तयार करण्यात येईल. जागतिक पातळीवरचे वस्त्रोद्योग प्रदर्शन महाराष्ट्रात भरविण्यासाठी सेंटर उभारण्यात येईल, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
केंद्र शासनाच्या पीएम मित्र योजनेंतर्गत राज्य शासनाने अमरावती येथील ब्राऊनफिल्ड पार्क आणि औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रीनफिल्ड पार्क असे प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविले आहेत, असे सांगून केंद्र सरकारचे वस्त्रोद्योग मंत्रालय आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजच्या सहकार्याने राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग मिशन (NTTM) अंतर्गत मुंबईत दि. २२ ते २४ फेब्रुवारी २०२३ दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाने तांत्रिक वस्त्रोद्योग परिषद-टेक्नोटेक्स-2023 या परिषदेला राज्य शासन सहकार्य करेल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.
वस्त्रोद्योग आत्मनिर्भर भारताच्या उभारणीतील महत्त्वाचे क्षेत्र
– केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश
“भारत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे. यामध्ये वस्त्रोद्योग क्षेत्राचा महत्त्वाचा वाटा आहे. भारतीय वस्त्रोद्योग बाजारपेठेत तांत्रिक वस्त्रोद्योगाचा वाटा जवळपास 13 टक्के असून जागतिक पातळीवरील तांत्रिक वस्त्रोद्योगाची वाढती मागणी लक्षात घेता वस्त्रोद्योग क्षेत्रात गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी संधी उपलब्ध आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या पीएम मित्र या योजनेमुळे या क्षेत्राला अधिक प्रोत्साहन मिळत आहे”, असे प्रतिपादन केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री श्रीमती दर्शना जरदोश यांनी केले.
“तांत्रिक वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र शासन प्रयत्न करत आहे. जागतिक स्तरावर तांत्रिक वस्त्रोद्योग ही एक मोठी बाजारपेठ आहे. ती अधिक मजबूत करण्यासाठी देशांतर्गत वापर आणि निर्यात या दोन्ही घटकांवर अधिक भर देणे आवश्यक आहे, असे सांगून वस्त्रोद्योगासाठी महाराष्ट्रात उत्तम पायाभूत सुविधा आणि पोषक वातावरण असल्यामुळे वस्त्रोद्योग क्षेत्रात महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहिलेले राज्य आहे”, असेही केंदीय राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी टेक्नोटेक्स-2023 महितीपुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करून ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली.