दहावी (SSC Exam) आणि बारावी (HSC Exam) परीक्षेबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून महत्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यावर्षी होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी अत्यंत कडक नियम करण्यात आले आहेत.
बोर्डाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची चोरी करणे, प्रश्नपत्रिका मिळविणे, विकणे आणि घेणे, मोबाईल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक्स माध्यमावर प्रसारित केल्यास अशा परीक्षार्थी विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अशा विद्यार्थ्यास पुढील 5 परीक्षांना प्रतिबंध करण्यात येणार आहे. याशिवाय त्या परीक्षार्थीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी नियम:
कोरोना काळात ऑनलाईन वर्ग भरत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या लेखनाचा सराव कमी झालाय ही बाब लक्षात घेऊन वेळ वाढवून देण्याचा निर्णय झाला आहे. अतिरिक्त प्रमाणामध्ये फिरती पथकं नेमण्यात येणार आहेत.
परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे महाविद्यालय किंवा शाळा हेच उपकेंद्र असेल अशी रचना करण्यात आली आहे. 40 टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा होणार आहे.
परीक्षेसाठी लस बंधनकारक असणार नाही. एखाद्या शाळा किंवा महाविद्यालयामध्ये 15 पेक्षा कमी विद्यार्थी असतील तर त्याजवळील महाविद्यालय केंद्र असणार आहे.
तोंडी परीक्षांसाठी बाह्य शिक्षक नसणार आहे आणि एकाच विषयाचे दोन शिक्षक असतील तर तेच परीक्षा घेणार आहेत.
परीक्षार्थींना 10 मिनिटे आधी प्रश्नपत्रिका मिळणार आहे. 40 ते 60 गुणांसाठी 15 मिनिटांचा अधिकचा कालावधीदेखील देण्यात येईल. 70 ते 100 गुणांची परीक्षा असल्यास अर्धा तासाचा अतिरिक्त वेळ देण्यात येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका वर्गात जास्तीत जास्त 25 विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बसवलं जाणार आहे. परीक्षेला विद्यार्थी झिग-झ्याग पद्धतीने सुरक्षित अंतर ठेऊन बसतील असे नियोजन केले आहे.
कोरोनामुळे परीक्षा देण्याची संधी हुकली तर 31 मार्च ते 18 एप्रिलदरम्यान पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे.
परीक्षांचे पर्यवेक्षक हे शाळा कॉलेजमधील असतील की बाहेरील असतील याबद्दल लवकरच ठरवलं जाईल. विद्यार्थ्यांच्या शाळा, कॉलेजांमध्येच केंद्र असल्याने कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.