‘खेलो इंडिया’ युथ गेम्स २०२२-२३
मुंबई, दि. ७ : गुजरात मधील राष्ट्रीय क्रीडास्पर्धांपाठोपाठ मध्यप्रदेश येथे आयोजित पाचव्या ‘खेलो इंडिया’ युवा स्पर्धेत राज्याच्या संघातील युवा खेळाडू नेत्रदीपक कामगिरी करत आहेत. जागतिक स्तरावरील स्पर्धा गाजवण्याची क्षमता असलेले युवा खेळाडू सध्या ‘खेलो इंडिया’ मध्ये पदकांचे मानकरी ठरत आहेत. याच दर्जेदार कामगिरीमुळे महाराष्ट्राचे खेळाडू निश्चितपणे आगामी काळामध्ये ऑलम्पिक सारखी स्पर्धा गाजवतील, ही प्रचंड क्षमता या युवा खेळाडूंमध्ये आहे, अशा शब्दात महाराष्ट्राचे क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी संघावर कौतुकाचा वर्षाव केला.
तिसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान मिळवण्यासाठी महाराष्ट्र संघ ‘खेलो इंडिया’ मध्ये आगेकूच करत आहे. महाराष्ट्र संघाने ॲथलेटिक्स, जिम्नॅस्टिक आणि योगासन खेळ प्रकारांत पदकांचे अर्धशतक साजरे केले. याशिवाय महाराष्ट्र संघाला या तिन्ही खेळ प्रकारात चॅम्पियनशिपचा बहुमान देत गौरवण्यात आले. त्यामुळेच महाराष्ट्र संघाला ८३ पदकांसह नवव्या दिवसाअखेर पदक तालिकेतील आपले अव्वल स्थान राखून ठेवता आले. आंतरराष्ट्रीय खेळाडू संयुक्त काळेने गोल्डन चौकार मारून पुन्हा एकदा महाराष्ट्र संघाला पदक तालिकेत अव्वल स्थानाचा बहुमान मिळवून दिला. त्याचबरोबर महिला युवा धावपटूंनी भोपाळच्या ट्रॅकवर सोनेरी यशाचा पल्ला गाठत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. रिलेमध्ये डबल गोल्डन धमाका उडवत महाराष्ट्राचा संघ सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. यादरम्यान जिम्नॅस्टिक मधील संयुक्ता काळे, ॲथलेटिक्स मध्ये रिया पाटील आणि तिच्या सहकारी खेळाडूंची कामगिरी, योगासनात नवयुवा योगपटू यांची कामगिरी लक्षवेधी ठरली. त्यामुळे महाराष्ट्र संघाला यजमान मध्यप्रदेश आणि हरियाणा संघाला धोबीपछाड देत पुन्हा अग्रस्थानी धडक मारता आली.
एकट्या महाराष्ट्र जिम्नॅस्टिक संघाचा पदकांचा दुहेरी आकडा; चार संघांच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्राची सात सुवर्णपदके”
संयुक्ता काळे, आर्यन, सार्थक, सारा यांच्या नेत्रदीपक कामगिरीमुळे महाराष्ट्र संघाला खेलो इंडिया युथ गेम्समधील जिम्नॅस्टिक खेळात वर्चस्व गाजवता आले. एकट्या महाराष्ट्र संघाने या इव्हेंटमध्ये पदकांचा दुहेरी आकडा गाठला. महाराष्ट्राने या खेळ प्रकारात सर्वाधिक १९ पदके जिंकली. यादरम्यान पदक तालिकेत दोन ते पाचव्या स्थानावर असलेल्या चार संघांच्या एकूण सुवर्णांच्या तुलनेन एकट्या महाराष्ट्राने सात सुवर्ण पटकावले आहेत. उत्तर प्रदेश ३, मध्य प्रदेश २, जम्मू-कश्मीर व गुजरात यांचे प्रत्येक १ सुवर्णपदक आहे. यात अव्वल स्थानी असलेल्या महाराष्ट्राच्या नावे सर्वाधिक ७ सुवर्णपदके आहेत.
सर्वाधिक १६ पदके योगासनात
योगासन खेळ प्रकारात महाराष्ट्र संघाला आपले वर्चस्व अबाधित ठेवता आले. पदार्पणातील या योगासन खेळ प्रकारात महाराष्ट्र संघाने सर्वाधिक १६ पदकांची कमाई केली. यामध्ये ५ सुवर्ण, ६ रौप्य आणि ५ कांस्यपदकांचा समावेश आहे. त्या पाठोपाठ पूजा दानोळे आणि संज्ञा पाटील यांच्या सुवर्ण यशाने लक्षवेधी ठरलेल्या सायकलिंग क्रीडा प्रकारात सात पदकांची कमाई करता आली.
खो-खो, बॅडमिंटन, बॉक्सिंग मध्ये पदकाचा बहुमान
महाराष्ट्र संघाने पाचव्या सत्रातील ‘खेलो इंडिया’ युथ गेम्स मध्ये खो खो, बॅडमिंटन आणि बॉक्सिंगमध्ये सोनेरी यशाची मोहीम कायम ठेवत पदकाचा बहुमान पटकावला. नरेंद्रच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुरुष खो-खो संघाने सोनेरी यशाचा पल्ला गाठला. तसेच खो-खो मध्ये महाराष्ट्राचा महिला संघ रौप्य पदकाचा मानकरी ठरला. ठाण्याच्या १४ वर्षीय नाईशा कौरने बॅडमिंटनच्या महिला एकेरीत महाराष्ट्राला रौप्य पदक जिंकून दिले. देविका घोरपडे, उमर शेख आणि कुणाल घोरपडे यांनी अचूक ठोसे मारून महाराष्ट्र संघाला गोल्डन हॅट्रिक साजरी करून दिली.
संयुक्तामुळे जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राचा दबदबा
आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणाऱ्या युवा खेळाडू संयुक्ता काळेने गोल्डन चौकार मारून महाराष्ट्र संघाला खेलो इंडियामध्ये पदक तालिकेत मोठी आघाडी मिळवून दिली. त्यामुळे महाराष्ट्र संघाला आता आपले वर्चस्व गाजवता येत आहे. तिच्यामुळे संघातील युवा खेळाडूंना सोनेरी यश संपादन करण्याची प्रेरणा मिळाली. यामुळे महाराष्ट्र संघाने जिम्नॅस्टिक्समध्ये १५ पेक्षा अधिक पदके जिंकण्याचा बहुमान पटकावला आहे.
महाराष्ट्र संघाच्या धावपटूंची कामगिरी कौतुकास्पद
महाराष्ट्राच्या युवा धावपटूंनी प्रचंड मेहनत आणि जिद्दीच्या बळावर खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये पदकाचा पल्ला गाठला आहे. घवघवीत सोनेरी यश संपादन करणारी महाराष्ट्राच्या युवा खेळाडूंची कामगिरी कौतुकास्पद ठरलेली आहे. त्यामुळेच महाराष्ट्राला चॅम्पियनशिपच्या बहुमनाने गौरवण्यात आले आहे.