मुंबईच्या वांद्रे-कुर्ला येथील नॅशनल स्टॉक एक्सचेंज येथे द सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्डस् वितरण कार्यक्रम झाला. कार्यक्रमास खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, द सीएसआर जर्नल एक्सलन्सचे अमित उपाध्याय, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे आशिष चौहान उपस्थित होते. कार्यक्रमात सर्च संस्थेच्या माध्यमातून दुर्गम भागात कार्य करणारे डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले, तर सामाजिक कार्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना सोशल चेंज पुरस्काराने गौरविण्यात आले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, समाजाच्या विकासासाठी विविध कॉर्पोरेट कंपन्यांचे सामाजिक दायित्व अधिक महत्त्वाचे आहे. काही कॉर्पोरेट्स कंपन्या दुर्गम भागात शासन पोचण्यापूर्वीच तिथे पोहचून काम करत आहेत, तर अनेक संस्था त्याही पलीकडे जाऊन स्वखुशीने अधिक योगदान देतात. समाजाच्या विकासासाठी कॉर्पोरेट सामाजिक दायित्वापेक्षा देखील नागरिकांचे सामाजिक दायित्व जपणे अधिक महत्त्वाचे मानतात हे लक्षात घेण्यासारखे आहे. समाजात बदल घडून आणण्यासाठी आपण स्वयंप्रेरणेने मनापासून काम करणे आवश्यक आहे. दुसऱ्यांचे दुःख स्वतःचे मानून काम करणे हे फार महत्त्वाचे असते, तरच सामाजिक क्षेत्रात चांगले काम होऊ शकते, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
द सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्ड – 2022 पुरस्कार सोहळ्याचे हे पाचवे वर्षे आहे. ‘द सीएसआर जनरल एक्सलन्स अवॉर्ड्स’मधून नवउद्यमींना प्रोत्साहन तसेच त्यांना नव्या कामासाठी उत्तेजन देण्यासाठी केले जाते. शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण, महिला सक्षमीकरण आणि बाल कल्याण, पर्यावरण, कृषी आणि ग्रामीण विकास आणि आरोग्य आणि स्वच्छता अशा पाच श्रेणींमधून हे पुरस्कार देण्यात आले. संपूर्ण जीवन निःस्वार्थपणे समर्पित करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान होणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे समाजाला प्रेरणा मिळते, असे सांगत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सर्व विजेत्या कंपनी आणि संस्थांचे अभिनंदन केले.