गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

पुढील चार दिवस गडचिरोली जिल्हयात पाऊस, वादळी वाऱ्यासह गारपीठ व विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज

नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

गडचिरोली : भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांच्या जिल्हास्तरीय अंदाजानुसार, दिनांक 16 ते 19 मार्च 2023 दरम्यान गडचिरोली जिल्हयामध्ये वादळी वारा, अवकाळी पाऊस, गारपीट तसेच विजा पडण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दिनांक १६ मार्च २०२३ रोजी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस तसेच तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा (वाऱ्याचा वेग- ३० ते ४० किमी प्रती तास राहण्याची) वाहण्याची अधिक शक्यता आहे.
दिनांक १७ मार्च २०२३ रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस तसेच तुरळक ठिकाणी गारपीट व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची अधिक शक्यता आहे.
तर दिनांक १८ मार्च व १९ मार्च २०२३ रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस तसेच तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा (वाऱ्याचा वेग- ३० ते ४० किमी प्रती तास राहण्याची) वाहण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे.
तरी जिल्हयातील सर्व नागरीकांनी सदर कालावधीमध्ये सुरक्षित राहुन याबाबत उचित खबरदारी बाळगावी असे आवाहन जिल्हाधिकारी संजय मीणा यांचेकडून करण्यात आले आहे.

*कृषी सल्ला*
पाऊस व गारपिटीचा अंदाज लक्षात घेता रब्बी हंगामातील परिपक्व अवस्थेतील (हरभरा, गहू, मोहरी, जवस इत्यादी.) पिकाची काढणी व मळनीची कामे तात्काळ उरकून घ्यावी. कापणी व मळणी च्या कामास पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्यास कम्बाईन हार्वेस्टर द्वारे काढणीची कामे करून घेण्यास प्राधान्य द्यावे. कापणी झाली असल्यास व पिक शेतामध्ये पसरले असल्यास शेतामध्ये उंचवटा असलेल्या ठिकाणी जमा करून ताडपत्री किंवा प्लास्टिक शीटच्या सहाय्याने शेतमाल झाकून ठेवावा. कापणी व मळणी केलेला शेतमाल पावसाच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी. मेघगर्जनेसह विजांची शक्यता लक्षात घेता शेतामध्ये काम करत असताना दोन व्यक्तींमध्ये जास्तीत जास्त अंतर ठेवावे. मेघगर्जनेची चाहूल लागताच तात्काळ सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. झाडांखाली आसरा घेणे कटाक्षाने टाळावे. शेळ्या, गाय, म्हैस व इतर पाळीव जनावरांना झाडाखाली न बांधता त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावे. जनावरांना मोकळ्या जागेत चारावयास सोडण्याचे टाळावे तसेच गोठया मधेच चारा व पाण्याची उपलब्धता करून घ्यावी. गोठ्याची देखभाल आणि दुरुस्तीची कामे तात्काळ पूर्ण करावी. बाजारायोग्य फळे व भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी.

विजांच्या ठीकाणांचे निरीक्षण करण्यासाठी दामिनी – लाईटनिंग अलर्ट (Damini : Lightning Alert) या मोबाईल ॲप चा वापर करावा तसेच विजांपासून बचावासाठी ॲप मध्ये उपलब्ध असलेल्या माहितीचा उपयोग करावा. दामिनी – लाईटनिंग अलर्ट (Damini : Lightning Alert) हे ॲप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करावे.