पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात १९ व्या षटकात शेटवच्या दोन चेंडूंमध्ये विराटने लगावलेले ते दोन षटकार आजही चर्चेत
काही आठवड्यांपूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये पार पडलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेची चर्चा अजूनही सुरु आहे. खास करुन स्पर्धेमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात विराट कोहलीने केलेली खेळी आजही या ना त्या कारणाने चर्चेत असते. मेलबर्नच्या क्रिकेट मैदनावर विराटने भारताला पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध रोमहर्षक विजय मिळून दिला आहे. पाकिस्तानी संघातील वेगवान गोलंदाज हॅरिस रौफला विराटने शेवटून दुसऱ्या षटकामध्ये दोन खणखणीत षटकार लगावत भारताला विजयाच्या जवळ नेण्यात आणि शेवटच्या षटकात विजय मिळून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
१९ व्या षटकामधील विराटचे हे षटकार टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम फटक्यांपैकी असल्याचं यापूर्वीही अनेकांनी म्हटलेलं असतानाच आता खुद्द हॅरिसनेही या षटकांबद्दल भाष्य केलं आहे. विराट कोहली वगळता इतर कोणाला ते फटके मारता आले नसते अशा अर्थाचं विधान हॅरिसने केलं आहे. हॅरिसने विराटची ही फटकेबाजी म्हणजे ‘क्लास’ दर्जाची फलंदाजी होती असं म्हटलं आहे.