आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत केंद्र शासनाची ‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना’ ही कृषी विभागाची महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांचा समावेश आहे.
सर्व प्रकारच्या सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना या योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेंतर्गत फळे व भाजीपाला उत्पादन प्रक्रिया, दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया, बेकरी उत्पादने, धान्ये प्रक्रिया, मसाले, लागवड पीके, मासे व सागरी उत्पादने प्रक्रिया, तेलबीया प्रक्रिया, मांस व पोल्ट्री उत्पादने, किरकोळ वन उत्पादने प्रक्रिया यांचा समावेश होतो.
प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा वैयक्तिक लाभार्थी तसेच स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्यांनी बीज भांडवलासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा. www.pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन अर्ज सादर करावा लागणार आहे.
योजनेचा लाभ घेऊन शेतकरी, शेतकरी कंपन्या, उत्पादन संस्था, स्वयंसहाय्यता गटांना उद्योग सुरु करता येतो. अधिक माहितीसाठी विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक (आत्मा), जिल्हा नोडल अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागेल. सन 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षासाठी ही योजना राबविली जात आहे.