राज्यभरातील शासकीय, निमशासकीय आरोग्य संस्थांसाठी औषधे, वैद्यकीय उपकरणे यांच्या खरेदीमध्ये सुसूत्रता ठेवण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण विभागासाठी लागणारी औषधे, वैद्यकीय उपकरणे यांची खरेदी करण्यासाठी प्राधिकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी या प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतील. सध्या आरोग्य विभागाच्या आयुक्तांना या पदाचा तात्पुरता कार्यभार देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या 8 वरिष्ठ पदांनाही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. राज्य सरकारकडून हे महत्त्वाचं पाऊल उचललं गेलं आहे.
“महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणामार्फत पारदर्शक पद्धतीने खरेदी प्रक्रिया राबवावी. रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा जाणवणार नाही याची दक्षता घ्यावी. रुग्णालयांना, आरोग्य संस्थांना वेळेवर औषधे आणि उपकरणे उपलब्ध झाले पाहिजे. प्राधिकरणाची प्रक्रिया पारदर्शक ठेवावी,” असे निर्देश आज सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाच्या पहिल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
“प्राधिकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करावे या संस्थेची विश्वासार्हता वाढवावी. त्याची कार्यपद्धती पारदर्शक राहिल्यास खासगी रुग्णालये देखील या प्राधिकरणाच्या माध्यमातून औषधे खरेदी करू शकतील,” असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले असून यावेळी प्राधिकरणाचा कार्यक्रम आराखडा, 2700 विविध औषधे आणि साहित्य खरेदी, कंत्राटी पद्धतीने पदभरती याबाबतही चर्चा करण्यात आली.