राज्याच्या सहकार क्षेत्रात नावलौकीक प्राप्त केलेले सहकार महर्षी अरविंद सा. पोरेड्डीवार यांना महाराष्ट्र सहकारी बॅंक्स असोसिएशन मुंबईच्या वतीने राज्याच्या सहकार क्षेत्रातील कै. विष्णू अण्णा पाटील जीवन गौरव पुरस्कार नाशिक येथील एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. अरविंद पोरेड्डीवारांना प्रदान करण्यात आलेला जीवन गौरव पुरस्कार हा त्यांच्या सहकार क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याची पावती असून राज्यस्तरावर गडचिरोली जिल्हयाचा नावालौलिक वाढविणारा आहे. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून पोरेड्डीवार यांचे जिल्हयाच्या विकासात महत्वपुर्ण योगदान आहे. नाशिक येथील पुरस्कार सोहळयानंतर सहकार महर्षी अरविंद पोरेड्डीवार यांचे आज मंगळवारी गडचिरोली शहरात आगमन झाले. त्यांचे गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात जल्लोषात स्वागत करण्यात आले. जेसीबीच्या सहाय्याने भलामोठा पुष्पहार व पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यांच्या स्वागतासाठी सहकार, राजकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
याप्रसंगी खासदार अशोक नेते, आमदार डॉ देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे प्रामुख्याने उपस्थित होते
इंदिरा गांधी चौकात जल्लोषात स्वागत करण्यात आल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत अभिनंदन सोहळा आयोजीत करण्यात आला अभिनंदन सोहळयाला भाजपाचे पदाधिकारी व सहकार क्षेत्रातील कार्यकर्तागण व शहरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. सहकार महर्षी अरविंद सा पोरेड्डीवार यांना नाशिक येथील गोखले संस्थेच्या सभागृहात केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या न्यु ड्राप्ट पॉलीसीचे चेअरमन तथा माजी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, सहकार आयुक्त अनिल कवडे, महाराष्ट्र राज्य बॅंक्स असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास ठाकूर यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना सहकारमहर्षी अरविंद पोरेड्डीवारांनी सहकार क्षेत्राची महत्ती विषद करून सहकार क्षेत्रातील अनेक आठवणींना उजाळा दिला.