ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय, शाळेला दांडी मारल्यास फटका बसणार..

 दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेत 75 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांसाठी हा नियम बंधनकारक नव्हता. मात्र, मार्च 2023 मधील परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची 75 टक्के उपस्थिती असणं बंधनकारक आहे.

शाळेत किमान 75 टक्के उपस्थिती असल्याशिवाय दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाची परीक्षा देता येणार नाही. किमान 75 टक्के उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांनाच परीक्षेची प्रवेशपत्रे दिली जातील. सर्व शाळा-महाविद्यालयांना शिक्षण विभागाने तसे आदेश दिले आहेत.

 प्राचार्य, मुख्याध्यापकांना सूचना
शाळा-महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीच्या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करावी. विद्यार्थ्यांच्या नियमित उपस्थितीबाबत शिक्षक, विद्यार्थी, पालकांना ही बाब निदर्शनास आणून द्यावी, असे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत.

 सीबीएसई’चा आधीच निर्णय
दरम्यान, ‘सीबीएसई’ बोर्डाने यापूर्वी 18 जुलैला देशभरातील शाळांना परिपत्रक पाठवून विद्यार्थ्यांची किमान 75 टक्के उपस्थिती अनिवार्य असल्याची सूचना केली होती. त्यानंतर आता राज्य शिक्षण मंडळानेही हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शाळेला सतत दांडी मारणाऱ्या विद्यार्थ्यांना दणका बसला आहे.