मुलचेरा-: महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिकांना उपयुक्त व महसूल विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती नागरिकांना सहज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मुलचेऱ्याचे उपक्रमशील तहसिलदार चेतन पाटील यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून तहसील कार्यालय मुलचेरा, महसूल मंडळ कार्यालय,मुलचेरा व महसूल शाखा,मुलचेरा येथे ‘QR कोडमहसूल वाचनालयाची’ स्थापना करण्यात आली. अनावर प्रसंगी निवासी नायब तहसीलदार श्री उसेंडी कार्यालयातील इतर अधिकारी, कर्मचारी,ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
विशेष म्हणजे सदर महसूल वाचनालयात भिती पत्रकाद्वारे गोष्टीरूपाने विविध महसूली कायद्याची पुस्तके मोफत पीडीएफ स्वरूपात क्यू आर कोड च्या माध्यमातून नागरिकांना व कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे.सदर उपक्रम नाविण्यपूर्ण उपक्रम असल्यामुळे नागरिकांचा सुद्धा सदर वाचनालयाकडे कल लागलेला आहे.
सदर वाचनालयामध्ये महाराष्ट्रातील सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी श्री.संजय कुंडेटकर,महसूल विभागातील अधिकारी श्री.शशिकांत जाधव, मोहसीन शेख तसेच यशदा पुणे यांची अतिशय सोप्या मराठी भाषेतील कायदेविषयक पुस्तके(वारसा नोंदी,महसूल न्यायालय,कायदा माहितीचा,रचना व कार्यपद्धती,तलाठी कामकाज इ.)क्युआर कोड स्कॅन केल्यानंतर सर्वांना पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध होतात. सोबतच शेतकऱ्यांना दैनंदीन उपयोगाच्या महसूल विभागासंबंधी उपयुक्त लिंक जसे की, डिजिटल स्वाक्षरीत सातबारा, भू नकाशा, आपली चावडी, ई-पिक पाहणी यासारख्या प्रणालींच्या लिंक ही क्यूआर कोड च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील हे एकमेव महसूली वाचनालय आहे.
