गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यात दि. 28.10.2022 रोजी नितीन पाटील आयुक्त, मानव विकास आयुक्तालय, औरंगाबाद यांचे अध्यक्षतेखाली मानव विकास कार्यक्रम अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीस संजय मीणा, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा मानव विकास समिती, गडचिरोली तसेच कुमार आशिर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प., गडचिरोली उपस्थित होते. सदर बैठकीस उपस्थित सर्व विभागप्रमुखांचे स्वागत अरविंद टेंभुर्णे जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) यांनी केले. मा. आयुक्त महोदयांनी मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी आधारभूत असलेले आरोग्य, शिक्षण व रोजगार निर्मिती या 03 घटकाशी संबंधित मानव विकास कार्यक्रमांतर्गत योजनाच्या संदर्भात गरीबातील गरीब घटक शोधून त्यांच्यापर्यंत योजनेचा लाभ पोहचविणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.
शिक्षण घटकांपर्यंत 8 वी ते 12 वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनीना सायकलीचे वाटप, बारावी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनींसाठी घर ते शाळा पर्यंत मोफत बस सेवा, आरोग्य घटकाशी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर प्रती माह 2 शिबिरांचे व ग्रामीण रुग्णालय स्तरावर प्रती माह 1 शिबिर आयोजीत करणे, अनुसुचित जाती/ जमाती व बीपीएल लाभार्थी असलेल्या गरोदर माता यांना बुडीत मजुरीचा लाभ देणे या योजनांचा लाभ जास्तीत जास्त देण्याबाबत आयुक्त महोदयांनी निर्देशित केले. रोजगार निर्मिती विषयक योजनांमध्ये शेळीपालन, कुक्कुटपालन, वराहपालन तसेच दुग्धव्यवसाय यांना जिल्ह्यात भरपूर वाव असल्याने याबाबत माविम व उमेद यांच्या बचत गटांचे प्रस्ताव सादर करणेबाबत सुचना दिल्या. तसेच जिल्ह्यात धान्य साठवणूक, तेंदु पत्ता संकलन, बांबु संकलन, महुआ संकलनसाठी गोडावून बांधकामाची मागणी लक्षात घेता ग्रामसभा तसेच आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत विविध कार्यकारी संस्था यांचेकडून गोडावून बांधकामाचे प्रस्ताव सादर करण्याबाबत संबंधित यंत्रणांना सुचना दिल्या.
जिल्हाधिकारी महोदयांनी जिल्ह्यामध्ये सुरजागड ता. एटापल्ली येथे लोहखनिज प्रकल्प सुरु असून भविष्यात सदर प्रकल्पामध्ये वाहन चालक तंत्रज्ञानाशी संबंधित कौशल्य प्रशिक्षत युवकांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासणार असून त्याकरीता कौशल्य विभागास प्रशिक्षण बाबत प्रस्ताव देणेबाबत सुचना दिल्या. तसेच मनरेगासोबत CONVERGENCE करुन गोडावून बांधकामाचे प्रस्ताव तयार करणेबाबत निर्देश दिले.
मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प., गडचिरोली यांनी अंगणवाडीचे बांधकाम, कुपोषित मुलांसाठी CTC घेणे व गरोदर व स्तनदा मातांसाठी स्थानिक आहार व तपासणी किट ची मागणी केली व तसा प्रस्ताव पाठविण्यासाठी मा. आयुक्त, मानव विकास यांनी सांगितले.