गडचिरोली, दि.03: आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याचे उद्देशाने महाराष्ट्र शासनाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत ११ क्रीडा प्रबोधिनीची स्थापना केली आहे. या क्रीडा प्रबोधिनीमधून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावे यासाठी शासनातर्फे कौशल्य खेळाडू शोध मोहीम राबविली जात आहे.
७ फेब्रुवारी २०२२ पासून ही टॅलेंट सर्च मोहीम राबविली जाणार असून यात राज्य व राष्ट्रीय स्तरावर पोहचलेल्या खेळाडूंना प्रवेश दिला जाणार आहे. राज्यातील एकूण ९ क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशासाठी सरळ प्रवेश प्रक्रीया व कौशल्य चाचणी अंतर्गत निवासी क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेश देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने भरती प्रक्रीया सुरू करणार आहे. यासाठी दिनांक २१ ते २५ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत विभागस्तरावर चाचण्यांचे आयोजन करुन खेळाडूंची निवड राज्यस्तर चाचणी करीता केली जाणार आहे. यामध्ये आर्चरी, ज्युदो, हॅण्डबॉल, ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, बॅडमिंटन, शुटींग, कुस्ती, हॉकी, टेबल-टेनिस, वेटलिफ्टींग, जिम्नॅस्टिक्स या खेळांचा समावेश आहे.
ज्या खेळाडूंचे वय १९ वर्षा आतील आहे अशा खेळाडूंची या निवासी प्रशिक्षण शिबिरासाठी निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या खेळाडूंना क्रीडा प्रबोधिनीच्या ठिकाणी शास्त्रोक्त प्रशिक्षण, शिक्षण, भोजन, निवास, अद्यावत क्रीडा सुविधा शासनाच्या वतीने मोफत पुरविल्या जाणार आहे. राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावर सहभागी खेळाडूंना संबंधित खेळाबाबतची चाचणी तज्ञ समिती समक्ष देऊन प्रवेश निश्चित केला जाईल. तसेच राज्यस्तरावर सहभागी खेळाडूंना खेळनिहाय कौशल्य चाचणीचे आयोजन करुन गुणानुक्रमे प्रवेश निश्चित केला जाईल.
उपरोक्त क्रीडा प्रबोधिनीच्या चाचण्यांचा प्रवेशासाठी इच्छूक खेळाडूंनी दिनांक १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत विहीत नमुन्यात अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कॉम्पलेक्स एरिया गडचिरोली येथे सादर करावा असे श्री घनश्याम राठोड जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.