अहेरी- कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रयत्नांना यश आले असून तालुक्यातील आलापल्ली वासीयांना आता मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड) मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आलापल्ली येथील ग्रामवासियांकडे मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड) नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रॉपर्टी कार्ड मिळावा यासाठी अनेकदा प्रयत्न करण्यात आले. मात्र ते शक्य झाले नाही. धर्मराव बाबा आत्राम आमदार असताना पासूनच याचा पाठपुरावा केला होता. सातत्याने ही मागणी लावून धरली होती.नुकतेच 2 जुलै रोजी आ. धर्मराव बाबा आत्राम यांनी मंत्री पदाची शपथ घेतली,त्यानंतर त्यांना अन्न व औषध प्रशासन खातेही मिळाले.खाते वाटप होताच त्यांनी आपल्या निर्वाचन क्षेत्रातील सर्वात महत्वाचे काम म्हणजेच आलापल्ली वासीयांना प्रॉपर्टी कार्ड मिळावे यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून आले.
नुकतेच त्यांनी उपसंचालक भूमी अभिलेख संलग्न जमाबंदी आयुक्त (नागरी भूमापन)पुणे यांच्याशी संपर्क साधून आलापल्ली वासियांना प्रॉपर्टी कार्ड मिळावे यासाठी तात्काळ पाऊल उचलण्याचे निर्देश दिले. मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे निर्देश मिळताच संबंधित कार्यालयाकडून सदर विषय तात्काळ मार्गी लावण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. येथील नागरिकांचा मालमत्तेबाबत पुनरचौकशीची कार्यवही लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे अल्लापल्ली वासियाना प्रॉपर्टी कार्ड मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.