मुंबई, दि.,११ : राज्यात आजपर्यंत लंपी चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या गोवंशीय पशुधन पशुपालकांच्या खात्यांवर तातडीने नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्याचे निर्देश महसूल ,पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
आज मंत्रालयात पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पशुधनास लंपी चर्मरोग प्रार्दुभाव विषयी आयोजित व्हीडीओ कॉन्फरन्स मध्ये त्यांनी राज्यातील संबंधित अधिकारी यांना सूचना केल्या.
या बैठकीस पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जगदीश गुप्ता,आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह,सह सचिव मानिक गुट्टे, सह आयुक्त डॉ. डी.डी.परकाळे यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
राज्यात गोठ्यातील कीटक नियंत्रण, निर्जंतुकीकरण
श्री.विखे पाटील म्हणाले, की, लंपी चर्म रोग हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा रोग कीटकांपासून पसरतो.महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठाने कीटकांच्या नियंत्रणासाठी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून राज्यात गोठ्यातील कीटक नियंत्रण, निर्जंतुकीकरण या महत्त्वपूर्ण बाबी पशुपालक व ग्रामपंचायती यांनी मोहीम स्वरूपात राबवण्यात याव्यात.
सरपंच, ग्रामसेवक आणि तलाठी यांना जबाबदारी सोपवावी
राज्यात लंपी चर्मरोग नियंत्रणात आणण्यासाठी जास्त प्रार्दुभाव असणाऱ्या जिल्ह्यात जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील संबंधित अधिकारी यांची बैठक घेऊन गोठ्यातील कीटक नियंत्रण, निर्जंतुकीकरण करण्यासाठी प्राधान्य द्यावे. गावातील सरपंच, ग्रामसेवक आणि तलाठी यांना जबाबदारी सोपवावी. रोगाचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी करण्यात येणाऱ्या प्रत्येक बाबींवर गांभीर्याने लक्ष ठेवावे.
माझा गोठा स्वच्छ गोठा अभियान
माझा गोठा स्वच्छ गोठा अभियान हे एक क्रांतिकारक अभियान असून एक चळवळ उभी करावी.हे अभियान महसूल, कृषी, पशुसंवर्धन आणि ग्रामविकास विभागाने समन्वयाने राबवावी. गोठा स्वच्छ ठेवल्यास लंपी तसेच इतर ससंर्गजन्य रोगापासून भविष्यातही पशुधन सुरक्षित राहू शकेल.
प्रत्येक जिल्ह्यासाठी २ कोटी रुपये
प्रत्येक जिल्ह्यासाठी २ कोटी रुपये देण्यात आले आहे. आणखी एक कोटी रुपये देण्यात येणार आहेत. शासनाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही. मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे. शासनाकडून औषधी,लसमात्रा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिले आहे. कसलाही प्रकारच्या अडचणी निर्माण झाले तर तात्काळ कळविण्यात याव्यात त्यावर उपाययोजना करण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी पशुपालकांकडे जाऊन औषधोपचार व लसीकरण करावे
शासकीय आणि खाजगी पशुवैद्यकांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने दिलेल्या सुधारीत उपचार प्रोटोकॉल प्रमाणे उपचार करावेत. शासकीय अधिकाऱ्यांनी पशुपालकांकडे जाऊन औषधोपचार व लसीकरण करावे. शासनाकडून मोफत औषधोपचार व लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असल्यामुळे सर्व पशुपालकांना विशेषरुपाने आवाहन करण्यात येते की त्यांनी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या पशुधनावर उपचार करून घेण्यासाठी सहकार्य करावे.
अद्यापही लसीकरण न झालेल्या गोवंशीय पशुधनास लसीकरण करण्याचे निर्देश
क्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय कृतीदलासमवेत झालेल्या दृकश्राव्य माध्यमाद्वारे आढावा बैठकीमध्ये लसीकरण न केलेल्या आणि लंपी चर्म रोगाने बाधीत नसलेल्या गायींच्या कुठल्याही वयाच्या वासरांना, तसेच अद्यापही लसीकरण न झालेल्या गोवंशीय पशुधनास लसीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले. यानुसार, गोपालकांनी त्यांच्या वासरे व गोवंशीय पशुधनास क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकक्षेतील गावांमध्ये अशा लसीकरणासाठी मोहीम स्वरूपात पुर्वनिर्धारीत केलेल्या दिवशी लसीकरण करून घेण्याचे आवाहनही श्री.विखे पाटील यांनी केले आहे.
या बैठकीस दूरदृष्यप्रणालीद्वारे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पशुसंर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.