११८५ कोटींची गुंतवणूक असलेला प्रकल्प नागपुरातून हैदराबादला, ६०० जणांचा रोजगार गेला?
‘टाटा-एअरबस’ प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या जात आहेत. त्यातच आता आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याची माहिती मिळत आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे नागपूरच्या मिहानमध्ये होणारा सॅफ्रन कंपनीचा प्रकल्प हैदराबादला गेल्याचं समजत आहे. त्यामुळे ‘वेदांता फायरफॉक्स’ आणि ‘टाटा-एअरबस’ यानंतर आता आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने सत्ताधारी-विरोधकांमधील वाद चिघळण्याची शक्यता आहे.
सॅफ्रन ग्रुप मिहानमध्ये ११८५ कोटींची गुंतवणूक करण्यास उत्सुक होता. विमान तसंच रॉकेट इंजिन बनवणाऱ्या या कंपनीने मात्र आता महाराष्ट्रातून माघार घेतली असल्याची माहिती मिळत आहे. हा प्रकल्प आता हैदराबादला गेला आहे. जागा मिळण्यास उशीर झाल्याने प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याची माहिती मिळत आहे. या प्रकल्पामुळे ५०० ते ६०० कामगारांच्या हाताला रोजगार मिळणार होता.
आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात
“सत्तेच्या हव्यासापोटी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय वातावरण अस्थिर केलं आहे. २०१४ नंतर महाराष्ट्रावर वक्रदृष्टी का पडत आहे?,” अशी विचारणा काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना केली आहे. “वेगळ्या विदर्भाच्या नावावर सत्तेत आलेले हे नेते, विदर्भावर आणि तरुणांवर अन्याय करत आहेत,” अशी टीका त्यांनी केली आहे.
‘एअरबस-टाटा’ प्रकल्पही गुजरातमध्ये!; नागपूरमध्ये २२ हजार कोटींची गुंतवणूक आणण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न असफल
“महाराष्ट्रात पायाभूत सुविधा, पाण्याची उपलब्धता आणि कुशल कामगार आहेत, तरीही प्रकल्प जाणं हा राजकीय करंटेपणा आहे. भाजपा सत्तेच्या हव्यासापोटी हे डबल इंजिन सरकार महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचं नुकसान करत आहे,” असंही ते म्हणाले आहेत.
भाजपाकडून महाविकास आघाडीवर खापर
“महाविकास आघाडी आणि घरात दाराला आतून कडी लावून बसलेले मुख्यमंत्री यांच्यामुळे हे प्रकल्प महाराष्ट्रातून गेले. यांच्या कालखंडात केंद्र सरकारने हे प्रकल्प निर्माण केले होते. दोन्ही वेळी याआधीच्या राज्य सरकारने कोणतीही पावलं उचलली नाहीत. आता शिंदे-फडणवीस सरकारवर खापर फोडण्याचा निंदनीय प्रयत्न सुरु आहे,” अशी टीका भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे. महाराष्ट्रात आगामी काळात मोठ्या प्रमाणात प्रकल्प येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
“तीन महिने कोणत्याही कंपनीला जमीन मिळत नाही. याचा अर्थ त्यांनी वर्षभरापूर्वी अर्ज केला असणार. एमआयडीसी किंवा मिहानमध्ये त्यांना जमीन मिळाली नसेल. या प्रकल्पांची घोषणा दोन वर्षांपूर्वी झाली होती. पण मागील सरकारने मंत्रीमंडळ बैठकीत ठरावही संमत केला नाही,” असा आरोप अतुल भातखळकर यांनी केला आहे.
राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर
“भाजपाला आरोप करण्यापलीकडे काही येत नाही. महाविकास आघाडीमुळे करोना आला आणि देशाची वाताहत झाली इतकंच म्हणणं आता बाकी आहे,” असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश तपासे यांनी लगावला आहे.
अतुल भातखळकरांना प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की “२०२० पासून तुम्ही सरकारला बदनाम करण्याची भूमिका घेतली आहे. जे काही होईल त्याला महाविकास आघाडी, उद्धव ठाकरे, शरद पवार जबाबदार आहेत असा एकमेव फालतू आरोप करण्यापलीकडे भाजपाला काही येत नाही. महाराष्ट्राची वाताहत होण्यासाठी, बदनाम करण्यासाठी एकमेव भाजपा जबाबदार आहे”.
“प्रकल्प गेल्यानंतर गुजरात पाकिस्तान आहे का? असं तुमचे नेतेच म्हणाले. सध्याच्या सरकावर उद्योजकच नव्हे तर शेतकऱ्याचाही विश्वास नाही,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.