ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्र दालनाला पुरस्कार

नवी दिल्ली, दि. 28 : यंदाच्या 41 व्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्र भागीदार राज्य म्हणून सहभागी झाले होते. या मेळ्यात महाराष्ट्र दालनाला ‘भागीदार राज्य’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

येथील प्रगती मैदानात 41 वा आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याची सुरूवात 14 नोव्हेंबरपासून  झाली होती. याचा समारोप रविवारी 27 नोव्हेंबरला झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ‘महाराष्ट्र दालना’ ला  पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन संस्थेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक प्रदीप खरोला यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक विजय कपाटे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ‘महाराष्ट्र दालन’ यावर्षी हॉल क्रमांक 2, तळमजल्यावर मांडण्यात आले होते.

यावर्षीच्या व्यापार मेळ्याची मध्यवर्ती संकल्पना “वोकल फॉर लोकल, लोकल टू ग्लोबल” होती.  ही संकल्पना मांडताना राज्याचे डिजिटल, ई-तंत्रज्ञान क्षेत्राचा विकास, लघुउद्योग, उत्पादन समूह केंद्र(क्लस्टर), बचत गट, स्टॉर्टअपला चालना देणारे धोरण, यासह इतर विषयांचे आकर्षक प्रदर्शन महाराष्ट्र दालनात दिसत होते. एकूण 45 स्टॉल्स याठिकाणी मांडण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्र शासनाचे तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाअंतर्गत येणाऱ्या निवडक विषयांवर स्टॉल्स उभारण्यात आले होते. बचत गटांचे, कारागिरांचे, सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांतर्गत  येणारे उद्योग समूह (क्लस्टर) चे  आणि  स्टॉर्टअपचे स्टॉल्स या ठिकाणी होते.

महाराष्ट्राचा सांस्कृतिक कार्यक्रम ‘महाराष्ट्र दिवस’ शनिवारी 26 नोव्हेंबरला येथील खुल्या सभागृहात  झाला. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.