गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

जागतिक हिवताप दिनानिमित्त प्रभातफेरीतून जनजागृती

“हिवतापाला संपवू या : पुन्हा योगदान द्या, पुनर्विचार करा, पुन्हा सक्रिय व्हा” या संकल्पनेखाली आज जागतिक हिवताप दिनाचे औचित्य साधून गडचिरोलीत विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. हिवताप निर्मूलनासाठी जनतेला सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने शहरातून प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रभातफेरीचा शुभारंभ करण्यात आला. या प्रभातफेरीमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचर्या प्रशिक्षणार्थी, आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी, अधिकारी यांनी हिवतापावरील घोषवाक्याच्या निनादात सहभाग घेतला. प्रभातफेरीचा समारोप महिला व बाल रुग्णालय येथे झाला.

या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा हिवताप कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, व महिला व बाल रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. सुहास गाडे होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. शिंदे, डॉ. किलनाके, डॉ. अमित साळवे, डॉ. प्रफुल हुलके, डॉ. प्रफुल गोरे, डॉ. प्रशांत पेंदाम, डॉ. रुपेश पेंदाम, डॉ. मनीष मेश्राम, डॉ. बागराज धुर्वे, डॉ. पुजा धुळे, श्री. शंतनु पाटील हे मंचावर उपस्थित होते.

डॉ. प्रताप शिंदे यांनी हिवताप रोखण्यासाठी नविन उपाययोजना सांगत मार्गदर्शन केले. डॉ. माधुरी किलनाके यांनी हिवतापविषयी माहिती देताना रोगाचे प्रतिबंध आणि उपाय स्पष्ट केले.

प्रास्ताविक श्री. राजेश कार्लेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अश्विनी ढोडरे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. संजय समर्थ यांनी केले. या कार्यक्रमासाठी हिवताप व हत्तीरोग विभागातील कर्मचारी वर्गाने विशेष सहकार्य केले.

जिल्हा आरोग्य अधिकारी व हिवताप विभागाने नागरिकांना हिवताप व डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी पुढील सूचनांचे काटेकोर पालन करावे व आपले आरोग्य जपावे असे आवाहन केले आहे.

आठवड्यातून एकदा पाणी साठवलेली भांडी स्वच्छ करा, बंद भांड्यांत टेमीफॉस टाका, पाण्याच्या टाक्यांना झाकण लावा, घरात व परिसरात पाणी साचणार नाही याची काळजी घ्या, फुलदाण्या, कुलर, फ्रिज यातील पाणी नियमित काढा, पूर्ण बाह्याचे कपडे घाला, रात्री मच्छरदाणीचा वापर करा, ताप आल्यास त्वरित रक्ततपासणी करून उपचार घ्या.