ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

लहान मुलांच्या आधार कार्डमध्ये मोठा बदल, ‘युआयडीएआय’चा महत्वपूर्ण निर्णय

आधार कार्ड आता लहान मुलांसाठीही अनिवार्य आहे. 5 वर्षांखालील मुलांकडे आधार कार्ड असणं अनिवार्य केले आहे. त्यास ‘बाल आधार कार्ड’ असं म्हटलं जात असून, त्याचा रंग निळा आहे. शाळेत प्रवेश घेण्यापासून विविध कामांसाठी हे आधार कार्ड वापरले जाते. आता तर थेट नवजात बालकालाही जन्मासोबतच आधार नोंदणी मिळणार आहे.

आधार कार्ड जारी करणाऱ्या ‘यूआयडीएआय’ नुकतेच बाल आधारबाबत मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. ताज्या मार्गदर्शक सूचनांनुसार, आता 5 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांच्याही आधार कार्डसाठी बायोमेट्रिक माहिती अपडेट करणे प्राधिकरणाने बंधनकारक केले आहे. याबाबत प्राधिकरणाने एक ट्विट केले असून, त्यात ही माहिती दिली आहे.

ट्विटमध्ये असं म्हटलंय, की 5 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांचे बायोमेट्रिक तपशील अपडेट करणे अनिवार्य असून, ही संपूर्ण प्रक्रिया मोफत असेल. बायोमेट्रिक्स अपडेट केल्यानंतर मुलांच्या आधार क्रमांकात कोणताही बदल होणार नाही. मुलांचे बायोमेट्रिक तपशील अपडेट करण्यासाठी जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट देण्याचे आवाहन प्राधिकरणाने केले आहे.