राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विद्यार्थ्यांना दरमहा मिळणाऱ्या विद्यावेतनात वाढ होणार आहे. आतापर्यंत या विद्यार्थ्यांना दरमहा 40 रुपये विद्यावेतन मिळत होते, आता ते 500 रुपये केले जाणार आहे.
हिवाळी अधिवेशनात आमदार विक्रम काळे, डॉ. सुधीर तांबे, सतीश चव्हाण, बाळाराम पाटील यांनी आयटीआयमधील विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाताचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ही घोषणा केली.
मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव
ते म्हणाले, की आयटीआय विद्यार्थ्यांचे विद्यावेतन हे 40 रुपयांवरून 500 रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. संबंधित प्रस्ताव हा मंत्रीमंडळासमोर मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असून, मंजुरीनंतर लगेच त्याची अंमलबजावणी केली जाईल.
‘आयटीआय’मधील कोर्सेस हे कालबाह्य झाले असून, नवीन कोर्सेसबाबत सरकार पुढील वर्षी घोषणा करणार आहे. राज्यातील 36 जिल्ह्यासाठी एक कमिटी स्थापन केली असून, प्रत्येक जिल्ह्यातील कंपन्यांनुसार कोर्स घेतले जातील, असे लोढा म्हणाले.