राज्यातील कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना आखल्या जातात. त्यापैकीच एक महत्त्वकांक्षी योजना म्हणजे बायोगॅस सयंत्र प्रकल्प योजना ही योजना देखील कृषी विभागाकडून अनुदान तत्त्वावर राबविले जात असून गरजू लाभार्थ्यांना यासाठी अनुदानाच्या माध्यमातून अर्थसहाय्य केलं जातं.
राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन योजनेअंतर्गत बायोगॅस सयंत्रासाठी व शौचालय जोडण्यासाठी शासनामार्फत अनुदान रक्कमेमध्ये वाढ करण्यात आलेली असून आता बायोगॅस प्लांट उभारणीसाठी जवळपास लाभार्थ्यांना 70 हजारापर्यंत अनुदान दिलं जाणार आहे. चालू वर्ष 2022-23 साठी जवळपास 5,400 बायोगॅस संयंत्र उभारण्याचे उद्दिष्ट शासनामार्फत ठेवण्यात आलं आहे.
बायोगॅस अनुदान योजनेची उद्दिष्टे
- स्वयंपाकासाठी व इतर घरगुती कामासाठी बायोगॅसचा वापर वाढावा.
- ग्रामीण भागातील महिलांना धुरामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्त करणे.
- सरपण म्हणजेच जाळण्याची लाकडापासून सुटका करणे.
- सरपणासाठी होत असलेली झाडांची तोड थांबवून वनांचे स्वरंक्षण करणे.
- बायोगॅसपासून तयार होण्याऱ्या शेणखताचा वापर शेतात करणे, परिणामी शेतातील रासायनिक खतांचा वापर कमी करणे.
- इतर इंजिनामध्ये बायोगॅसचा वापर करून पेट्रोल व डिझेलचा वापर कमी करणे.
मिळणारी एकूण अनुदान रक्कम
१ घनमीटर क्षमतेपासून २० ते २५ घनमीटर क्षमतेच्या बायोगॅस प्रकल्पासाठी अनुदान देण्यात येतं. बायोगॅस सयंत्रास खुल्या प्रवर्गाच्या लाभार्थ्यांना आकारमानानुसार 9,800 रु. पासून ते 52,800 रु. पर्यंत अनुदान मिळणार आहे
याशिवाय अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गासाठी आकारमानानुसार 17,000 ते 70,400 रु. पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. बायोगॅस संयंत्राला शौचालयाची जोडणी केल्यास अतिरिक्त 1,600 रुपयांचे अनुदान देय असेल.
बायोगॅस अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रं
- गट विकास अधिकारी यांच्या नावे विहित नमुन्यातील अर्ज
- लाभार्थीच्या नावाने असेलला शेतीचा ७/१२ व ८ अ उतारा
- भूमिहीन शेतमजूर असल्यास त्याबाबत तलाठयाचा दाखला
- लाभार्थ्यासह पूर्ण झालेल्या संयंत्राचा फोटो
- ग्रामसेवकाकडील पाच ते सहा जनावरे असल्याचा दाखला
- लाभार्थ्यांनी संयंत्र प्रकल्प स्वखर्चाने बांधून अर्ज संबंधित कार्यालयाकडे दाखल करावा
बायोगॅस अनुदान योजना अर्ज प्रक्रिया
बायोगॅस अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदाराला जिल्हा स्तरावर कृषी विकास अधिकाऱ्यांशी संपर्क करावा लागेल, तर तालुकास्तरावर गटविकास अधिकारी/कृषी अधिकारी/विस्तार अधिकारी (कृषी) यांच्याशी संपर्क करून संबंधित अर्जाची प्रक्रिया विहित नमुन्यातील सर्व कागदपत्रे दाखल करून घ्यावी लागेल.