ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

दिव्यांगांच्या दारापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवा – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

जिल्हा सामान्य रुग्णालयात भव्य एकत्रित दिव्यांग प्रमाणपत्र वाटप व १० खाटांच्या वृद्धावस्था काळजी कक्षाचे उद्घाटन

एक टक्का निधी दिव्यांग कल्याणासाठी राखीव

गडचिरोली, (जिमाका), दि. ०५ :
जिल्ह्यातील कोणतीही दिव्यांग व्यक्ती, प्रमाणपत्र व शासकीय लाभांपासून वंचित राहू नये. ज्यांना अद्याप दिव्यांग प्रमाणपत्रे मिळालेली नाहीत, त्यांना ती तातडीने उपलब्ध करून द्यावीत व सर्व दिव्यांगांची नोंदणी पूर्ण करून प्रमाणपत्रे व इतर शासकीय लाभ थेट त्यांच्या दारापर्यंत पोहोचवावेत, अशा सूचना सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी आज दिल्या.

ॲड. आशिष जयस्वाल जिल्हा सामान्य रुग्णालय, येथे आयोजित एकत्रित दिव्यांग प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम व १० खाटांच्या वृद्धावस्था काळजी कक्षाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. जिल्हा विकास निधीतील एक टक्का निधी दिव्यांग कल्याणासाठी राखीव ठेवण्यात आला असून, सहाय्यक साधने, विविध वस्तू तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत दिव्यांगांना आत्मनिर्भर करण्यावर शासनाचा भर राहील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दिव्यांग कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, गडचिरोली व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ सुलभतेने मिळावा, या उद्देशाने एकूण ४७५ दिव्यांग लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे एकत्रित वितरण करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी आज २१० दिव्यांग लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले असून, उर्वरित लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण दिनांक ०६ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात येणार आहे.

याचवेळी ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या विशेष शारीरिक व मानसिक गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या १० खाटांच्या नव्या वृद्धावस्था काळजी कक्षाचे मान्यवरांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमास आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ वर्षा लहाडे , आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. शशीकांत शंभरकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश टेकाडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. छाया उईके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बागराज धुर्वे यांच्यासह आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने परिश्रम घेतले.