गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

काजू हे पीक गडचिरोली साठी वरदान ठरणार:भाग्यश्रीताई आत्राम

अहेरी उपविभागातील 100 शेतकरी काजू लागवडीचा अभ्यासासाठी वेंगुर्ला कडे रवाना

अहेरी: उपविभागातील काजू लागवडीसाठी वाव अभ्यासून कृषी विभागा मार्फत अहेरी उपविभागातील अहेरी, एटापल्ली भामरागड सिरोंचा या चार तालुक्यात मागील एका वर्षापासून 150 हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली आहे. या बागेची चांगल्या प्रकारे निगा राखणे व व्यवस्थापन कौशल्य अभ्यासण्यासाठी तसेच नवीन शेतकऱ्यांना काजू लागवडीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी आहेरी उपविभागातील 100 शेतकऱ्यांचा प्रक्षेत्र अभ्यास दौरा/ प्रशिक्षण कार्यक्रमाचा कृषी विभागामार्फत आयोजित करण्यात आला आहे. या अभ्यास दौऱ्यासाठी चारही तालुक्यातून शंभर शेतकरी नुकतेच अहेरी येथून शिरपूर कागजनगर ते बेळगाव मार्गे वेंगुर्ला येथे प्रशिक्षणासाठी रवाना झाले. या अभ्यास दौऱ्यासाठी निघालेल्या वाहनास माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी हिरवी झेंडी दाखवून अभ्यास दौरा कार्यक्रमातील शेतकऱ्यांना यावेळी शुभेच्छा दिल्या. नियोजित वेळी उपस्थित राहून शेतकऱ्यांना वेंगुर्ला व कोल्हापूर भागातील काजू उत्पादन तंत्रज्ञान आपल्या भागात रुजवावे असे आवाहन केले.आपल्या भागात व्यावसायिक पिके वाढवण्यासाठी काजू हे पीक वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान या योजनेअंतर्गत या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असून कोल्हापुरातील सर्वात जास्त उत्पादकता असलेल्या चंदगड तालुका व सिंधुदुर्ग मधील वेंगुरला व येथील काजू उत्पादक, काजू प्रक्रिया धारक, काजूची बाजारपेठ, नर्सरी तसेच आंबा व नारळ उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रासह फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे या अभ्यास दौऱ्या दरम्यान प्रक्षेत्र प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय पौष्टिकरणधान्य वर्ष निमित्त या भागात नाचणीचे उत्पादन होत असल्याने नाचणी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रक्षेत्रास भेट देऊन नाचणी या पिकाची माहिती घेण्यात येणार आहे. तसेच नाचणी प्रक्रिया तसेच त्यापासून निर्माण होणारे पदार्थ याबाबतचे उद्योग यांना सुद्धा भेटी आयोजित करण्यात आले आहे. अहेरी तालुक्यातील 24 ,भामरागड मधील 30, सिरोंचा मधील 13 तर एतापल्ली मधील 33 असे एकूण शंभर शेतकरी व आठ अधिकारी कर्मचारी रवाना झाले आहे.

यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी आनंद गंजेवार, तंत्र अधिकारी भाऊसाहेब लावंड, तालुका कृषी अधिकारी अहेरी संदेश खरात, तालुका कृषी अधिकारी अमोल नेटके, कृषी पर्यवेक्षक सुधाकर होळी, चव्हाण व परसवार तसेच उपविभागातील सर्व कृषी सहाय्यक आणि शेतकरी बांधव तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आनंद गंजेवार यांनी प्रास्ताविक मांडले तर श्री संदेश खरात यांनी आभार मानले.