औरंगाबाद दि.4 (जिमाका) :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातून जाणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी केली. औरंगाबाद जिल्ह्यातून 54 तर जालना जिल्ह्यातून समृद्धीचा 42 किलोमीटरचा मार्ग जात आहे. या संपूर्ण मार्गावर मोटर वाहनाने प्रवास करत त्यांनी मार्गाची पाहणी केली. स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वाहन चालवित होते.
जालना जिल्ह्यात समृद्धी महामार्गावरील जामवाडी येथे मोटार वाहनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केले. याप्रसंगी आमदार नारायण कुचे, माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, उपविभागीय अधिकारी संदिपान सानप आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
औरंगाबाद जिल्ह्यातील सावंगी येथील इंटरपासलगत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आगमन झाले. यावेळी पालकमंत्री संदिपान भूमरे, सहकार मंत्री अतुल सावे, विशेष पोलिस महानिरीक्षक मल्लिकार्जून प्रसन्ना, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, पोलिस अधिक्षक मनीष कलवानिया आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आज सकाळी समृद्धी मार्गाच्या नागपूर येथील झिरो पॉईंट येथून प्रवासाला सुरुवात केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः समृद्धी महामार्गावर वाहन चालवत होते. त्यांच्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसले होते.
औरंगाबाद जिल्ह्यात 54 किमीचा मार्ग
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग जिल्ह्यातील औरंगाबाद, वैजापुर तालुक्यातून जातो. या दरम्यान 2 टोल, 4 फ्लायओव्हर, 05 इंटरचेंज् (सावंगी व शेंद्रा/ जयपुर एमआयडीसी, माळीवाडा, हडसपिंपळगाव व जांबरगांव) आहेत.
जालना जिल्ह्यात 42 किमीचा मार्ग
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग जालना जिल्ह्याच्या जालना व बदनापूर तालुक्यांतून जातो. जिल्ह्यातील या महामार्गाचे अंतर सुमारे 42 कि. मी. इतके आहे. टोल प्लाझा / इंटरचेंज 1 असून निधोना, ता. जालना येथे हा टोल प्लाझा / इंटरचेंज आहे. जालना व बदनापूर तालुक्यातील सुमारे 25 गावांतून हा महामार्ग जातो. नाव्हा, वरुड, कडवंची, नंदापूर, थार, अहंकार देऊळगाव, दहेवाडी, पानशेंद्रा, श्रीकृष्णनगर, जामवाडी, गुंडेवाडी, जालना, तांदुळवाडी, आंबेडकरवाडी, निधोना, कडगाव, नजीकपांगरी, केळीगव्हाण, भराडखेडा, निकळक, अकोला, गोकुळवाडी, सोमठाणा, दुधनवाडी आणि गेवराईबाजार अशी या गावांची नावे आहेत.