ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी केली अमरावती जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाची पाहणी

अमरावती, दि. 4 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या अमरावती जिल्ह्यातील कामाची पाहणी केली.

समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या टप्प्याचे लवकरच लोकार्पण होणार असून, त्याअनुषंगाने मुख्यमंत्री श्री. शिंदे व उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज महामार्गाची पाहणी केली. नागपूर येथून समृद्धी महामार्गास प्रारंभ होत असून तेथून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी पाहणी दौरा सुरु केला. अमरावती जिल्ह्यात समृद्धी महामार्गाची लांबी 73 किलोमीटर आहे. या संपूर्ण मार्गात प्रवास करत मार्गाची पाहणी करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः वाहन चालविले.

अमरावती जिल्ह्यात महामार्गावर आसेगाव आणि शिवणी या दोन ठिकाणी टोल प्लाझा देण्यात आले आहे.

नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे या तालुक्यातून आणि 46 गावांमधून महामार्ग जात आहे. एकूण लांबी 73 किमी आहे. महामार्गाची रुंदी 120 मीटर असून सदर मार्ग 6 पदरी आहे.

मार्गावर 4 मोठे व 64 लहान अशा 68 पुलांचा समावेश आहे. एक रेल्वे उड्डाणपूल आहे. महामार्गावरील वाहतुक विना अडथळा होण्यासाठी 31 व्हेईकल अंडरपास आहेत. लाईट व्हेईकल अंडरपास 9 आहेत. प्राण्यांना संचारासाठी कॅटल अंडरपास 34 आहेत. व्हेईकल ओव्हरपास एक आहे. महामार्गासाठी जिल्ह्यात 1 हजार 73 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जिल्ह्यात महामार्गासाठी 2 हजार 850 कोटी खर्च झाला आहे.

दौऱ्याच्या अनुषंगाने धामणगावनजिकच्या टप्प्यावर जिल्हा प्रशासनातर्फे बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आमदार प्रताप अडसड, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, उपजिल्हाधिकारी राम लंके, तहसीलदार पुरूषोत्तम भुसारी, वैशाख वाहुरवाघ यांच्यासह पोलीस अधिकारी, समृद्धी महामार्गाचे अधिकारी उपस्थित होते.