न्यूज नेशन वृत्तवाहिनीच्या न्यूज स्टेट महाराष्ट्रतर्फे ‘संकल्प महाराष्ट्र’ परिसंवादाचे आयोजन
मुंबई, दि. 8 : मुंबई शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी ६ हजार ५०० कोटी रुपये खर्चून काँक्रिट रस्त्यांचे काम सुरू आहे. सर्वत्र सुशोभीकरण सुरू आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मेट्रोचा विस्तार सुरू आहे, तर कोस्टल रोडच्या कामाला गती देण्यात आली आहे. ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’च्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यात येत आहेत. आगामी काळात मुंबईकरांना हक्काच्या सोयीसुविधा मिळवून देण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.
न्यूज नेशन वृत्तवाहिनीच्या न्यूज स्टेट महाराष्ट्रतर्फे आयोजित ‘संकल्प महाराष्ट्र’ परिसंवादात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. त्याबरोबरच देशाचीही आर्थिक राजधानी आहे. मुंबई शहरात देशातीलच नव्हे, तर जगभरातील पर्यटक येतात. या पार्श्वभूमीवर विविध विकास प्रकल्प राबविण्यात येत आहेत. मुंबई- गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला गती देण्यात आली आहे. मोडकळीस आलेल्या इमारतींचा नियोजनबद्ध विकास करण्यात येईल. कोळी बांधवांच्या सुविधेसाठी कोस्टल रोडच्या नेव्हिगेशनमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या माध्यमातून रेल्वेसह पायाभूत सोयीसुविधांसाठी निधी उपलब्ध होत आहे.
आमचे सरकार राज्याच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचे सांगतानाच जागतिक दर्जाचा समृद्धी महामार्ग आकारास आला आहे. त्याची भूसंपादन प्रक्रियाही विक्रमी वेळेत पूर्ण केली. त्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. त्यांच्यात विश्वास निर्माण केला. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून शेतकऱ्यांनी भूसंपादन प्रक्रियेला सकारात्मक प्रतिसाद दिला. या महामार्गामुळे या परिसरात उद्योगांना चालना मिळणार आहे. त्यासाठी आवश्यक सवलती राज्य सरकारतर्फे दिल्या जातील. त्याबरोबरच रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. या महामार्गाच्या दोन्ही बाजूला ३३ लाख रोपांची लागवड करण्यात येईल. तसेच सौर ऊर्जा निर्मितीही प्रस्तावित आहे.
राज्याला ७२० किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. समुद्र किनारे रस्त्यांशी जोडले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मुंबई- सिंधुदुर्ग ग्रीन फिल्ड रस्ता तयार करण्यात येणार असून त्यावर प्रकल्प अहवालाचे काम सुरू आहे. त्यामुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळून रोजगार वाढण्यास मदत होईल, असे ते यावेळी म्हणाले.
कोकणात लहान- मोठे बंधारे बांधून पावसाचे पाणी अडविण्यावर भर देण्यात आला आहे. पौष्टिक धान्य उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान अंगीकारणासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. मराठवाडा, विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार सर्वतोपरी उपाययोजना करीत आहे. पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी अडवून ते मराठवाडा ग्रीडच्या माध्यमातून आणण्याचे नियेाजन सुरू आहे. त्यासाठी ही योजना पुनर्जीवित करण्यात येत आहे. जलयुक्त शिवार योजना सुरू करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.