मुंबई दि २७ :- “राज्यात पावसाला चांगली सुरूवात झाली आहे… पेरणी झाली का.. नागली घेता का? भात लावणीसाठी यंत्राची मदत घ्या, कमी वेळेत जास्त काम होईल, शिवाय मनुष्यबळही कमी लागेल…नागली, वरईसह आणि वेगवेगळ्या पिकांची लागवड करा, यातून उत्पन्न वाढण्यास मदत होईल” असे सांगतानाच राज्य शासन आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिली.
राजस्थानच्या सीकर येथे आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. कृषिमंत्री धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे, अपर मुख्य सचिव अनुपकुमार आणि ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते.
पारंपरिक पिकांसोबतच नव्या तंत्रज्ञानाची जोड देत पीक पद्धतीत बदल होणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळले पाहिजे. शेतकऱ्यांपर्यंत कृषी तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्न करीत असून भात लागवडीसाठी आधुनिक यंत्रे अनेक ठिकाणी पुरविण्यात आली आहेत. या यंत्रांचा वापर करा, ठाणे, पालघरच्या काही भागात नाचणी, वरीची उत्पादकता चांगली असून त्याचे क्षेत्र वाढवा, नाचणीला मोठी मागणी असून यंदाचे वर्ष हे तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १४ व्या हप्त्याच्या वितरणाच्या कार्यक्रमाचे कृषी विभागाच्या वतीने राज्यातील १३ हजार गावांमध्ये थेट प्रसारण करण्यात आले. यात सहा लाखांपेक्षा अधिक शेतकरी सहभागी झाले होते.
