‘सदाबहार, चतुरस्त्र कलायात्री गमावली
मुंबई, दि. 19 : आपल्या सदा हसतमुख आणि प्रसन्न अभिनयाने चित्रपट, दूरचित्रवाणी या क्षेत्रात अमीट छाप सोडणारी चतुरस्त्र कलायात्री गमावली, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेत्री बेबी तबस्सुम यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.
भारतीय चित्रपट आणि पुढे दूरचित्रवाणी क्षेत्रात देखील आपल्या चतुरस्त्र कामगिरीने बेबी तबस्सुम यांनी एक काळ गाजवला. बालकलाकार ते मार्गदर्शकाच्या भूमिकेतील ज्येष्ठ कलावंत असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. चित्रपटाचा रुपेरी पडदा आणि घराघरातील दूरचित्रवाणीचा पडदा त्यांनी आपल्या प्रसन्नचित्त मुद्रेने व्यापून टाकला. गायन, अभिनय, निवेदन-सूत्रसंचालन, दिग्दर्शन, निर्मिती अशा सर्वच क्षेत्रात त्यांनी आपल्या कामगिरीने अमीट छाप उमटवली. त्यांच्या निधनामुळे एक चतुरस्त्र आणि सदाबहार असे कलायात्रीच आपण गमावली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री बेबा तबस्सुम यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
