गडचिरोली, दि. 1 मे : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे उद्घाटन आज राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते संपन्न झाले.
या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, तसेच कक्षातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सहपालकमंत्री ॲड. जयस्वाल म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या कक्षामुळे गडचिरोली जिल्ह्यातील गरीब व गरजू रुग्णांना स्थानिक पातळीवरच वैद्यकीय मदतीसाठी सहाय्य मिळणार आहे. रुग्णांनी यासाठी मुंबई, नागपूरसारख्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही. कक्षात नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलतेने व तत्परतेने कार्य करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
*मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष स्थापनेचा उद्देश:*
समाजातील गरीब व गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, धर्मदाय रुग्णालयांतर्गत मोफत उपचार मिळवून देणे, महात्मा फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत योजनेसह इतर योजनांची माहिती व सुविधा रुग्णांना मिळवून देणे, तसेच योजनेच्या बाहेर असलेल्या रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत मदत पुरविणे हे या कक्षाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
यावेळी उपजिल्हाधिकारी (भुसंपादन )प्रसेनजित प्रधान, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील, तहसिलदार सचिन जैस्वाल, मोहनीश शेलवटवर, श्री दांडेकर, संतोष आष्टीकर नायब तहसिलदार हेमंत मोहरे, संगीता धकाते, मोहसीन मडकाम, श्री राऊत तसेच मा. मुख्यमंत्री सचिवालय मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख डॉ. मनोहर मडावी व सदर कक्षातील कर्मचारी वृंद इतर कर्मचारी उपस्थित होते.