महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा भक्कम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (ता. 3) महत्वपूर्ण घोषणा केल्या. राज्यात पुढील काळात तब्बल 700 ठिकाणी ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू केला जाणार आहे. त्या माध्यमातून नागरिकांना घराजवळ आरोग्य सुविधा मिळतील, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
एका खासगी कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. ते म्हणाले, की राज्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्याला सरकार सर्वोच्च प्राधान्य देत आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली..
प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले जाणार आहे. तसेच, बाल आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले जाईल. राज्यात सुमारे 700 ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ उभारले जातील. त्यातील एकट्या मुंबईत 227 ठिकाणी असे दवाखाने सुरू करणार आहोत. त्यापैकी 50 दवाखाने 2 ऑक्टोबरपासून सुरू झाल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
ते म्हणाले, की ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा स्थानिक पातळीवरच मिळाव्यात, यासाठी खासगी संस्थांच्या मदतीने प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांच्या बळकटीकरण केले जाणार आहे. त्यासाठी आरोग्य संस्थांचे श्रेणीवर्धन केले जाईल. सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून आरोग्य संस्थांचे सक्षमीकरण केले जात आहे.
ग्रामीण भागातील आरोग्य क्षेत्रात ‘आशा’ स्वयंसेविकांचे योगदान महत्वाचे आहे. कोरोना काळातही त्यांनी उल्लेखनीय काम केले. त्यांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करील. तसेच, वैद्यकीय महाविद्यालयांच्या माध्यमातून पुरेसे डॉक्टर, नर्सची उपलब्धता होईल. वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात काम करण्यासाठी प्रोत्साहन देणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यात कॅथलॅब सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य संस्थांचे काम 80 ते 90 टक्के पूर्ण झालेल्या भागात निधी उपलब्ध करून दिला जाईल व ते काम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करु. नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.