ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 9 एप्रिलला खासदार, आमदार आणि कार्यकर्त्यांसह गाठणार अयोध्या, नेमका कसा असेल शिंदेंचा अयोध्या दौरा ?

मुख्यमंत्री शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी शिवसेनेकडून जय्यत तयारी सुरू आहे. या दौऱ्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत मंत्री, आमदार, पदाधिकारी असे सगळेच अयोध्येला जाणार आहेत. कार्यकर्त्यांना अयोध्येला जाण्यासाठी विशेष ट्रेनही बुक करण्यात आल्याचं खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितलं आहे.

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) 9 एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते प्रभू रामचंद्राचे दर्शन घेणार आहेत. आपल्या अयोध्या दौऱ्यावेळी (Ayodhya Visit) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची भेट घेणार असल्याचीही माहिती मिळाली आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या वतीनं मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू आहे.

कार्यकर्त्यांसाठी विशेष ट्रेन
मुख्यमंत्री शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी शिवसेनेकडून जय्यत तयारी सुरू आहे. या दौऱ्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत मंत्री, आमदार, पदाधिकारी असे सगळेच अयोध्येला जाणार आहेत. कार्यकर्त्यांना अयोध्येला जाण्यासाठी विशेष ट्रेनही बुक करण्यात आल्याचं खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत माहिती देताना खासदार हेमंत गोडसे म्हणाले की, “9 तारखेला अयोध्या दौरा आहे. आम्ही सर्व शिवसैनिक अयोध्येला जाणार आहोत. शिवसेना प्रमुखांचे विचार सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, भाजप युती अखंडित राहून चांगले कार्य आमच्या हातून घडो, राज्याचा विकास होवो यासाठी अयोध्या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. आज (शुक्रवारी) नाशिकहून विशेष ट्रेन जाणार आहे. हजारो संख्येने कार्यकर्ते अयोध्येत दाखल होणार आहेत. तर, 8 तारखेला मुंबईतून सर्व आमदार, खासदार मुख्यमंत्र्यांसोबत एकत्र जाणार आहेत.”

शरयू आरती करणार मुख्यमंत्री
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तयार केलेल्या कार्यक्रमात रामलला, हनुमान गढी दर्शन पूजन, मंदिराच्या बांधकाम जागेची पाहणी, शरयू आरती आणि लक्ष्मण किल्ला मंदिरात संतांचे आशीर्वाद घेणे यांचा समावेश आहे. शिवसैनिक 8 एप्रिलपासून अयोध्येत यायला सुरुवात होईल. तर मुख्यमंत्री शिंदे 9 एप्रिलला अयोध्येला पोहोचणार आहेत. संध्याकाळी शरयू आरती करून ते मुंबईला परततील.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 9 एप्रिलला अयोध्येत पोहोचणार असून रामललाचे दर्शन घेणार आहेत. त्यांचा अयोध्या दौरा अविस्मरणीय बनवण्यासाठी शिवसेनेचे राष्ट्रीय सचिव अभिजित अडसूळ आणि राज्य प्रभारी विक्रम सिंह गुरुवारी अयोध्येत पोहोचले आहेत. संपूर्ण कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेऊन ते दोन दिवसांत अंतिम स्वरूप देतील. 7 आणि 8 एप्रिल रोजी लखनौ ते अयोध्येपर्यंत शिंदेंच्या स्वागतासाठी सुमारे 1500 बॅनर्स आणि पोस्टर्स लावण्यात येणार आहेत. शिवसेनेचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने बॅनर, पोस्टर लावण्याच्या तयारीत आहेत.