जखमींना तत्काळ उपचार, कुटुंबियांना मदतीचे निर्देश
मुंबई, दि. ४:- पुण्यात येरवडा परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याने झालेल्या मजुरांच्या मृत्यूवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. दुर्घटनेतील जखमींना चांगले उपचार मिळावेत तसेच मृतांच्या आणि जखमींच्या कुटुंबियांना आवश्यक ती सर्व मदत करण्याबाबत त्यांनी यंत्रणांना निर्देश दिले आहेत.
इमारतींचे बांधकाम तसेच अन्य कामांच्या ठिकाणीही जीवितहानी होऊ नये, यासाठीच्या सुरक्षा उपाय योजनांची खबरदारी घेण्यात यावी. त्याबाबत संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. दुर्घटनेतील जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रति मुख्यमंत्र्यांनी सहवेदना प्रकट केली आहे.
