गडचिरोली दि.१८: जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी रविवार, १७ नोव्हेंबर रोजी येथील चंद्रपूर मार्गावरील क्रांतीवीर बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत असलेल्या सुरक्षा कक्ष व मतमोजणी कक्षाची पाहणी करून मतमोजणीच्या तयारीचा आढावा घेतला व महत्त्वाच्या सूचना दिल्या.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी बुधवार, २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून ६८- गडचिरोली (अ.ज.) विधानसभा मतदार संघाची मतमोजणी शनिवार,२३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता पासून होणार आहे. या अनुषंगाने मतमोजणी संबंधीची तयारी सुरू आहे. जिल्हाधिकारी संजय दैने यांनी मतमोजणी कक्षाला भेट देऊन मतमोजणी कक्षाचे निरीक्षण केले. मतमोजणी कक्षाची रचना , बैठक व्यवस्था, सभोवतालचा परिसर व त्यासंबंधीची सुरक्षा व्यवस्था तसेच इतर अनुषंगिक बाबींचा आढावा घेतला.सुरक्षेसह मतमोजणी व्यवस्थेबाबत कोणतीही उणीव राहणार नाही याबाबत खबरदारी घेण्याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल कुमार मीना,सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (चामोर्शी)अमित रंजन , उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.विवेक घोडके, गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संतोष आष्टीकर, धानोराचे तहसीलदार अविनाश शेंबटवाड,चामोर्शीचे तहसीलदार प्रशांत घोरूडे , नायब तहसीलदार हेमंत मोहरे आदी अधिकारी उपस्थिती होते.