ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

देवदा–एटापल्ली रस्त्याच्या कामाबाबत तक्रार; चौकशीचे निर्देश

देवदा–एटापल्ली रस्त्याच्या कामाबाबत तक्रार; चौकशीचे निर्देश

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सार्वजनिक बांधकाम विभागास पत्र

देवदा ते एटापल्ली या महत्त्वाच्या मार्गावरील रस्त्याच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाली असून, या प्रकरणी चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथून सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांना पाठविण्यात आलेल्या पत्रानुसार, संबंधित रस्त्याचे काम मंजूर आराखडा व तांत्रिक स्पेसिफिकेशननुसार न झाल्याची तक्रार दाखल झाली आहे. ही तक्रार ग्रामसभा सचिव सूर्यप्रकाश चांदेकर (पुल्लीगुंडम, ग्रामपंचायत बोलेपल्ली, पोस्ट रेगडी, ता. मुलचेरा, जि. गडचिरोली) यांनी १४ जानेवारी २०२६ रोजी सादर केली आहे.

तक्रारीत देवदा–एटापल्ली रस्त्याच्या कामात निकृष्ट साहित्य वापरणे, गुणवत्तेची निकष पूर्ण न करणे तसेच कामाची पातळी अपेक्षित दर्जाची नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित कामाची तांत्रिक तपासणी करून दोषींवर आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाने तक्रारीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाला नियमानुसार स्थळ तपासणी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती अर्जदारास लेखी स्वरूपात कळविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

या घडामोडींमुळे देवदा–एटापल्ली रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत चौकशीची प्रक्रिया सुरू झाली असून, प्रशासनाकडून पुढील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.