गडचिरोली दि.२८ : जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बळकट करण्यासाठी सुरू असलेल्या ४५० किलोमीटर लांबीच्या ऑप्टिकल फायबर दुरुस्तीचे काम येत्या तीन महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.
ऑप्टिकल फायबर दुरुस्ती संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित बैठकीत श्री पंडा बोलत होते. महाआयटीचे महाव्यवस्थापक मकरंद कुर्तडीकर, सहव्यवस्थापक नवनितकुमार, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक सुनील मोकडे आणि स्टरलाईट कंपनीचे प्रतिनिधी घनश्याम यादव यावेळी उपस्थित होते.
महानेट प्रकल्पांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील (अहेरी, भामरागड, एटापल्ली, कोरची, सिरोंचा व धानोरा) प्रत्येक ग्रामपंचायतीला ऑप्टिकल फायबर नेटवर्कद्वारे इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. परंतु अनेक भागांत बँडविड्थ उपलब्ध न झाल्याने इंटरनेट सेवा सुरू करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री पंडा यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केल्यानंतर राज्यस्तरीय पथकाने गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. पाहणीत सहा तालुक्यांतील ऑप्टिकल फायबर नादुरुस्त असल्याचे आढळले.
या प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यातील ६ तालुक्यांतील ग्रामपंचायत, शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्रे (PHC) यांना दर्जेदार व जलद इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे दुर्गम व ग्रामीण भागांतील नागरिकांना विविध शासकीय योजना, आरोग्य सेवा व शिक्षण सेवा ऑनलाईन स्वरुपात सहज मिळणार आहेत.
जिल्हाधिकारी पंडा यांनी कामात कोणतीही अडचण अथवा दिरंगाई होऊ नये यासाठी संबंधित विभाग व कंत्राटदारांना सूचना दिल्या आहेत. तसेच कामाच्या गुणवत्तेवर काटेकोर देखरेख ठेवली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत राज्य पातळीवरील टीम आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
